कोरोना वार्डात गरोदर स्त्रियांच्या सेवेत व प्रसूतीत अधिपरिचरिका शोधतेय आनंद
स्वतःच्या लेकापासून ५६ दिवसांच्या विरहातही कोरोना वार्डात गरोदर स्त्रियांच्या सेवेत व प्रसूतीत अधिपरिचरिका शोधतेय आनंद
सिंदखेडराजा:- कोविड १९ रोगाच्या साथी मध्ये कोरोना वारीअर्स आपापल्या आघाड्यांवर चोख कामगिरी बजावत आहेत. त्याद्वारे होणाऱ्या मानवतेच्या सेवेचा आनंद व समाधान स्वतःसह, कुटुंब तसेच परिसरात व्यक्त होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
असाच एक प्रकार स्वतःच्या सहा वर्षीय मुलापासून दूर राहत, स्त्री रुग्णालयातील कोरोना वार्डात सेवा देणाऱ्या अधिपरिचरिका अनुराधा सपकाळ खिल्लारे यांच्या बाबतीत आढळून आला आहे.
देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात रणजीत खिल्लारे हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून तर पत्नी अनुराधा सपकाळ खिल्लारे ह्या अधिपरिचरिका म्हणून सेवारत होत्या. अनुराधा सपकाळ खिल्लारे यांची प्रशासकीय बाबीमुळे बुलडाणा येथे बदली झाली आहे. तेथेही कोरोना वार्ड असलेल्या स्त्री रुग्णालयात त्यांची ड्युटी लागली. त्याला सकारात्मक कर्तव्याचा भाग म्हणून सपकाळ यांनी घेऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. या दरम्यान या वार्डातील प्रसूती विभागातील गरोदर स्त्रिया व छोटछोट्या बालक बलिकांना जीव लावत, त्यांची सेवा करीत स्वतःच्या सहा वर्षीय मुलापासून छप्पन दिवस दूर असल्याच्या विरहावर उपाय शोधत असतात.
याचवेळी प्रसूती विभागात राजस्थान राज्यातून आलेली कोरोना संशयित महिला रुग्ण भरती झाली. त्यानंतर अनुराधा सपकाळ खिल्लारे व बाविस्कर ह्यांनी तिचे बाळंतपण केले आणि प्रसूती यशस्वीपणे पार पडली व त्या महिलेने सुंदर अशा पुत्र रत्नाला जन्म दिला.
कर्तव्यापायी स्वतःच्या मुलापासून दूर राहणाऱ्या या कर्तबगार अधिपरिचरिकेचे समाजमाध्यमातून देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुका परिसरात कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏