दोन महिन्यांपासून पगार नाहीत जि. प. शिक्षक वर्ग अडचणीत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दोन महिन्यांपासून पगार नाहीत
जि. प. शिक्षक वर्ग अडचणीत
सिंदखेडराजा:- सलग दोन महिन्यांपासून पगार खोळंबले असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगाराची तरतूद करण्याची मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघ व कास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शिक्षकांचे मार्च व एप्रिल अशा सलग दोन महिन्यांचे पगार मे महिन्याच्या अर्ध्यावर येऊन सुद्धा झालेले नाहीत. त्यातल्या त्यात फेब्रुवारी महिन्यातच आयकर कपात झाली असल्याने शिक्षकांजवळची गंगाजळी सुद्धा लवकर संपुष्टात आली आहे. त्यातच अडचणीत भर म्हणजे वेळेवर पगार झाले नसल्याने बहुसंख्य शिक्षकांवर असलेल्या गृहकर्ज, एलआयसी तसेच इतर बँका व पतसंस्था यांच्या कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने त्याच्यावरील व्याज व दंडाच्या रकमेचा बोजाही वाढत आहे. याचवेळी घरखर्च करणेही मुश्कील झाले आहे.
यासंदर्भात पंचायत समितीच्या शिक्षण आस्थापना विभागात विचारणा केली असता जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच शिक्षकांच्या पगाराची लवकरात लवकर तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर म. रा. प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकिशोर शिंगणे यांच्यासह सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष नंदकिशोर खरात, कार्याध्यक्ष व्ही. टी. जायभाये, सरचिटणीस शिवकुमार वाघ, कोषाध्यक्ष लिंबाजी तायडे, अशोक नागरे तसेच कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष संतोष सोनुने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏