मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघालेल्या महिलेची सिंदखेडराजा मध्ये प्रसूती
मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघालेल्या महिलेची सिंदखेडराजा मध्ये प्रसूती
सिंदखेडराजा:- लॉकडाऊन दरम्यान खाजगी रुग्णवाहिकेने आपल्या राज्यात परतणाऱ्या कुटुंबातील गर्भवती महिला त्याच गाडीत प्रसूत झाल्याची घटना आज दुपारी ४ वा. सुमारास घडली. सिंदखेडराजा पासून अवघ्या दोन किमी अंतरावर महिला प्रसूत झाल्याची माहिती मिळताच त्या महिलेला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत बाळाची नाळ कापण्यात आली. त्यानंतर काही वेळाने हे कुटुंबीय आपल्या मार्गाने रवाना झाले. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कोणत्या प्रकारे हाल होत आहे, ह्याचा वेगळा प्रकार आज अनुभवास आला.
मध्यप्रदेशातील खंडवा येथील नंदू पाटील, वय ३३ वर्षे व त्यांची पत्नी रुख्मिणी, वय २९ वर्षे हे पती पत्नी अंबड तालुक्यात शेतीमध्ये सालाने काम करण्यासाठी गेलेले होते. याच दरम्यान कोरोना विषाणूच्या उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच रुख्मिणी पाटील या गर्भवती होत्या. तर दुसरीकडे लॉकडाऊनचे टप्पेही एक एक करीत वाढत चालले होते. त्यामुळे पती नंदू पाटील यांनी आपल्या मध्यप्रदेशातील घरी जाण्यातच भले असल्याचे मनोमन निश्चित केले. यासाठी खाजगी रुग्णवाहिका भाड्याने केली. आज अंबड येथून निघून खंडवा येथे जाण्यासाठी पाटील पती - पत्नी व त्यांची तीन वर्षीय बालिका हे रुग्णवाहिका चालक गणेश जाधव यांच्यासह जालना मार्गे देऊळगावराजा जाण्याऐवजी रस्ता चुकून ते सिंदखेडराजा मार्गाला लागले. मार्गक्रमण करीत सिंदखेडराजा जवळच असलेल्या सावरगाव माळ नजीक मार्गावर असतांना रुख्मिणी पाटील यांना कळा येऊन, चालत्या वाहनातच प्रसूती झाली. ही बाब समाजसेवी बुद्दु चौधरी यांनी समजताच त्यांनी त्या रुग्णवाहिकेला येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याचवेळी तेथे उपस्थित वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुभाष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जय आघाव, अधिपरिचरिका सविता मोरे यांनी तातडीने त्या रुग्णवाहिकेत जाऊन बाळाची नाळ कापली. त्यावेळी हे बाळ मुलगा असल्याचे लक्षात आले. पाठोपाठ बुद्दु चौधरी व परिचर काळे यांच्या मदतीने आई रुख्मिणी व अर्भक यांना रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्यावर आवश्यक उपचार करीत, काही काळ योग्य निगा घेण्यात आली. बाळ व बाळंतीण सुखरुप व व्यवस्थित झाल्याने काही वेळातच पुन्हा नंदू व रुख्मिणी पाटील हे पती पत्नी आपली मुलगी व नवजात मुलासह रुग्णवाहिकेत बसून मार्गाला लागले.
कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आपापल्या राज्यात परतणाऱ्यांवर तहान, भूक आदिंसह वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत आहेत. आजच्या घटनेतून एक वेगळ्याच प्रकारचे संकट उभे ठाकले होते. मात्र वेळेवर मदत व उपचार मिळाल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून आले.
परिस्थिती खूपच वाईट होती ..
रुग्णवाहिकेत बाळंतीण झालेली रुख्मिणी पाटील व नवजात बालक हे प्रसूती दरम्यान झालेल्या रक्तपतनाच्या स्थितीत तसेच पडून होते. प्रसूतीमुळे आई झालेल्या रुख्मिणी पाटील यांना ग्लानी येऊन त्या बेशुद्धावस्थेकडे चालल्या होत्या. मात्र वेळेवर वैद्यकीय मदत व उपचार झाल्याने दोघेही सुखरुप वाचले. अन्यथा वेगळेच चित्र निर्माण झाले असते, असे समाजसेवी युवक बुद्दु चौधरीने दिव्यमराठी सोबत बोलतांना सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏