विहिरीत पडलेली ती नीलगाय तब्बल २४ तासानंतर गर्भगळीत अवस्थेत काढली बाहेर ..
विहिरीत पडलेली ती नीलगाय तब्बल २४ तासानंतर गर्भगळीत अवस्थेत काढली बाहेर ..
सिंदखेडराजा:- तालुक्यातील सिंदी शिवारातील एका विहीरीत काल दि. १ मे रोजी पडलेली नीलगाय तब्बल २४ तासानंतर आज सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आली आहे. जगण्यासाठीच्या संघर्षाने व उपाशीपोटी असल्याने गर्भगळीत झालेली ही नीलगाय कशीबशी शिवारात गायब झाली.
सिंदी येथील बद्री साहेबराव दहातोंडे यांचे गावापासून उत्तरेच्या दिशेला शेत आहे. या शेतामध्ये पिकांच्या सिंचनासाठी त्यांची विहीर आहे. काल दि. १ मे, शुक्रवारी सकाळीच शेतातील विहिरीत नीलगाय पडल्याचे बद्री दहातोंडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ह्याबाबत पोलीस पाटील वैशाली मदन हाडे यांना कळविले. पोलीस पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी विहिरीतील नीलगाय आक्रमक होऊ शकते म्हणून बाहेर काढण्याचा कुणीही प्रयत्न करु नये, आम्ही येत आहोत असे शेळके नामक कर्मचाऱ्यांकडून कळविण्यात आले. मात्र सायंकाळ होत असतांना विहिरीतून नीलगाय काढण्यासाठी दोरीचे फासे बनविणारा व्यक्ती अजून मिळाला नसल्याचे सांगण्यात येऊन उद्या दि. २ मे, शनिवारी सकाळी नीलगाय काढण्यात येईल असे सांगितले होते.
त्यामुळे काल विहिरीत पडलेली नीलगाय तब्बल २४ तास विहिरीतच राहिली. विहिरीत पडल्याबरोबर तरंगण्यासाठी संघर्ष करीत तिने बसण्यासाठी विहिरीतील कपार मिळविले. तसेच दिवसा व रात्री खाण्यासाठी काहीही मिळाले नसल्याने तिच्या शरीरातील ऊर्जा नष्ट होऊन ती गर्भगळीत झाली होती. आज सकाळी वनरक्षक शेळके व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी तिला दोरांच्या साहाय्याने ओढून विहिरीबाहेर काढले. त्यानंतर तिला मोकळे सोडले असता कसेबसे उभे राहत अडखळत ती शिवारात निघून गेली.
यामुळे वनविभागाच्या वरिष्ठांनी या नीलगायीला बाहेर संदर्भात व्यवस्थित नियोजन केले नसल्याने, ती गर्भगळीत होऊन अशक्त झाल्याच्या तसेच तिच्या जगण्याच्या संदर्भात शंकाकुशंकात्मक चर्चा घटनास्थळी आढळून आल्या होत्या.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏