तहानेने व्याकुळ बैलांना कुमारवयीन युवकाने पाजले पाणी ..
तहानेने व्याकुळ बैलांना कुमारवयीन युवकाने पाजले पाणी ..
जावे त्यांंच्या वंशा तेंव्हा कळे .. उक्तीचा आला प्रत्यय ..
सिंदखेडराजा:- खरिपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. याचवेळी बी - बियाणे, खतांच्या बेगमीसाठी तहानभूक विसरून शेतकरी खरेदीची लगबगही करु लागला आहे. अशाच एका प्रसंगात तालुक्यातील दुसरबीड येथे बैलगाडी सोडून तिथेच बैलांना बांधत मालक कामासाठी गेला असतांना त्याच्या व्याकुळ बैलांना एका कुमारवयीन युवकाने पाणी पाजल्याची घटना लक्षवेधी ठरली आहे.
मुंबई ते नागपूर राज्य महामार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड या गावाला अनेक खेडी जोडलेली असल्याने तसेच काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरु असलेल्या सहकारी साखरकारखान्यामुळे बाजारपेठेचे स्वरुप प्राप्त झालेले आहे.
त्यामुळे परिसरातील गावांतील ग्राहकांची रेलचेल येथे नेहमी आढळून येते. सध्या कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर येथील वर्दळ कमी झालेली असली तरीही महत्वाच्या कामासाठी परिसरातील ग्रामस्थांना येथे यावेच लागते.
आज दि. २५ मे, सोमवारी १० वा. च्या सुमारास परिसरातील एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन खते व बी - बियाणे खरेदीसाठी दुसरबीडला आला होता. महामार्गाच्या बाजूला सुरक्षित जागा पाहत त्याने आपली बैलगाडी तेथे सोडून बैल गाडीलाच बांधले होते. एक दोन तास होऊनही त्याचे काम आटोपले नव्हते. त्यामुळे बैलांच्या पाणी पिण्याची वेळही निघून जात असल्याची अवस्था निर्माण होती. त्यामुळे मूक प्राणी असलेले बैल अस्वस्थ होऊन, तहानेने व्याकुळ होत पाण्यासाठी हंबरडा फोडू लागले.
त्यांचा तो केविलवाणा हंबरडा ऐकून बाजूच्याच घरात राहत असलेल्या १७ वर्षीय युवराज ह्या कुमारवयीन युवकाचे मन हेलावले. भूतदयेपोटी त्याने घरातून पाण्याच्या बादल्या भरुन आणत त्या बैलांची तहान भागवली.
हा युवराज म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक व सध्या शेतीत होईल तेवढे काम करत, मन रमविणारे लक्ष्मणराव वाघ व जि. प. सदस्या सौ. सरस्वती वाघ यांचा नातू तसेच भाजपचे राज्य चिटणीस युवानेते विनोद वाघ यांचा मुलगा आहे. शिक्षणासाठी तो पुणे येथे असतो. सुट्टीमध्ये घरी आलेला असतांनाच, कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सध्या तो दुसरबीड येथेच आहे.
युवराजच्या या दिसायला अगदी छोट्या परंतु अर्थाने मोठ्या अशा कार्यामुळे आजूबाजूला प्रशंसनीय चर्चेला सुरुवात झाली.
हा प्रसंग जरी तात्कालिक व क्षणिक स्वरुपाचा वाटत असला तरी शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्य असल्याने, "जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे" ह्या उक्तीची प्रचिती आली एवढे मात्र खरे ..!

Well done bhai
उत्तर द्याहटवा