श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे! परंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांचे भाविकांना आवाहन; ११ ऑक्टोबरपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!

परंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांचे भाविकांना आवाहन;

११ ऑक्टोबरपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

देऊळगावराजा:

ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या देऊळगावराजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानच्या वतीने यंदाही वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ पासून यात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह विविध भागांतील भाविकांनी श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी आणि यात्रोत्सवातील धार्मिक सोहळ्यांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे परंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे.

श्री बालाजी महाराज हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले आणि सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक मोठ्या श्रद्धेने देऊळगावराजा येथे दाखल होत असतात. या यात्रोत्सवामुळे धार्मिक परंपरेचे जतन होण्याबरोबरच भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेण्याची संधी मिळते.

संस्थानच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने यात्रोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारपासून बुधवार, दि. २१ ऑक्टोबरपर्यंत दसरा पालखी मिरवणुकीचा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सूर्योदयाच्या वेळी लळीत कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, आश्विन यात्रा उत्सवाचा कालावधी ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ असा आहे. तसेच कार्तिक यात्रा उत्सवाचे आयोजन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी कार्तिक मंडपोत्सव, तर शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी कार्तिक लळीत कार्यक्रम पार पडणार आहे.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेता यावे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी संस्थानच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह साधुसंत, गुणीजन, हरिदास, पुराणिक, भजनी मंडळी, दिंडीकरी, वारकरी आणि व्यापारी बांधवांनीही या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन श्रीजींच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री बालाजी महाराजांची ऐतिहासिक धार्मिक परंपरा आणि भक्तीचा वारसा जपत यंदाचाही यात्रोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव आणि व्यवस्थापक कि. दा. बीडकर यांनी श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगावराजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली