शब्दसेवेचा गौरव; प्रा. मधुकर जाधव यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ प्रदान : : उमरद येथील वीर जिवाजी महाले जयंती उत्सवात साहित्यिक योगदानाचा सन्मान
शब्दसेवेचा गौरव; प्रा. मधुकर जाधव यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ प्रदान
उमरद येथील वीर जिवाजी महाले जयंती उत्सवात साहित्यिक योगदानाचा सन्मान
देऊळगावराजा:-
लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा जपत साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रा. मधुकर जाधव यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. उमरद, ता. सिंदखेडराजा येथे वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सवात हा सन्मान प्रदान करण्यात आला. आपल्या साहित्यसेवेचा गौरव आपल्या मातीतील माणसांकडून होणे, ही या पुरस्काराची विशेष भावस्पर्शी बाजू ठरली.
देऊळगावराजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. जाधव हे अध्यापनासोबतच सातत्यपूर्ण साहित्यलेखन, काव्यनिर्मिती आणि प्रबोधनपर व्याख्यानांच्या माध्यमातून साहित्य व सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी एका पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश आहे, तर दुसऱ्या पुस्तकाचा शासनमान्य ग्रंथयादीत समावेश करण्यात आला आहे. विविध साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग असतो. साहित्याची अभिव्यक्ती आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून अनुभवायला मिळतो.
प्रभाकर वखरे आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर बिडवे यांच्या उपस्थितीत प्रा. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरदच्या सरपंच सौ. निर्मला पंढरीनाथ उबाळे होत्या. यावेळी सदाशिव ढोलेकर यांचे व्याख्यानही संपन्न झाले.
या उत्सवात वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, आध्यात्मिक, देशसेवा, शौर्य, गायनकला आणि व्याख्यान अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
‘गावाने दिलेली प्रेमाची पावती’
पुरस्काराविषयी भावना व्यक्त करताना प्रा. मधुकर जाधव म्हणाले, “आपल्याच गावाने दिलेला सन्मान हा मनाला विशेष आनंद आणि समाधान देणारा असतो. आपल्या माणसांनी आपल्या कार्याची घेतलेली दखल हीच खरी प्रेरणा असते. ‘साहित्य सेवा पुरस्कार’ हा माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून, माझ्या साहित्यप्रवासाला गावाने दिलेली प्रेमाची पावती आहे. हा सन्मान माझ्या गावाला आणि माझ्या साहित्यप्रेमी वाचकांना समर्पित करतो.”
प्रा. जाधव यांच्या या सन्मानाबद्दल श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त तथा श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले.
लेखणीशी असलेली निष्ठा, साहित्यावरील प्रेम आणि प्रबोधनाची बांधिलकी यांना मिळालेली ही दाद प्रा. जाधव यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

टिप्पण्या