देऊळगावराजात दोन गटांच्या सशस्त्र संघर्षात दोघांचा मृत्यू प्रकरणी : : परस्परविरोधी गुन्हे दाखल; २० आरोपी अटकेत : : नगरसेवक अन्वर शेख व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरिफ पठाण यांच्यावर अंत्यसंस्कार

देऊळगावराजात दोन गटांच्या सशस्त्र संघर्षात दोघांचा मृत्यू प्रकरणी 

परस्परविरोधी गुन्हे दाखल; २० आरोपी अटकेत

नगरसेवक अन्वर शेख व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरिफ पठाण यांच्यावर अंत्यसंस्कार 

देऊळगावराजा/वृत्तसेवा :

शहरात सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री दोन गटांमध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने संपूर्ण शहर हादरले. चाकू, तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या व कुऱ्हाडी यांसारख्या शस्त्रांनी झालेल्या तुफान हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे विद्यमान नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पदाधिकारी आरिफ खान हारून खान पठाण यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा रक्तरंजित संघर्ष देऊळगावराजा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच घडला.

या घटनेनंतर देऊळगावराजा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही मृतकांवर देऊळगावराजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

किरकोळ वादातून दुसऱ्या दिवशी रक्तरंजित संघर्ष

प्राथमिक माहितीनुसार, शहरातील एका कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून काही मुलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मोठ्यांपर्यंत पोहोचला. दिवसभर दोन्ही गटांमध्ये तणाव राहिल्यानंतर सोमवारी रात्री हा वाद चिघळला आणि दोन्ही गट आमनेसामने आले. मात्र, या हिंसक संघर्षामागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास अद्याप सुरू आहे.

पहिल्या फिर्यादीवर जीवघेणा हल्ला

पोलिसांच्या प्रेसनोटनुसार, शेख अतिक शेख उमर (वय ३३, रा. प्रताप नगर, देऊळगावराजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास प्रतापनगर/भोलेशहा दर्ग्याजवळ रोडवर शेख अकीब शेख पाशू व इतर आरोपींनी हातात चाकू, लाकडी दांडा व कुऱ्हाड घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवून पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला केला.

या हल्ल्यात फिर्यादीचे नातेवाईक आसिफ ऊर्फ आरिफ हारून पठाण (वय ३५) यांच्यावर चाकू व कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. तसेच इतर नातेवाईकांनाही गंभीर दुखापत करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(२), १०९, ३३३, ६१(ब), १८९(४), १८९(५), १९०, १९१(१), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटाकडूनही हल्ल्याची तक्रार

दरम्यान, शेख मुजाहिद शेख अली (वय ४६, रा. हकीम कॉलनी, देऊळगावराजा) यांनीही पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास प्रतापनगर/भोलेशहा दर्ग्याजवळ रोडवर शाहरुख खान अहमद खान व इतरांनी कट रचून फिर्यादी व त्यांच्या भावाकडे पाहून, “कल इस्के बच्चों ने हमारे लड़कों के साथ झगड़े किये, इनको आज जानसे मार डालो,” अशा स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर बोलत हल्ला केल्याचे नमूद आहे.

या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ शेख अन्वर ऊर्फ अन्नू शेख अली (वय ४२) याच्यावर लोखंडी रॉड, चाकू आणि काठ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी व साक्षीदारांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० आरोपी अटकेत; उर्वरितांचा शोध सुरू

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर देऊळगावराजा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.

पोलिसांच्या प्रेसनोटनुसार, दोन्ही गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी आणि सपोनि सविता कुवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

घटनेनंतर देऊळगावराजा शहर आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर अफवा अथवा भावना दुखावणारे संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन केले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

दोन्ही मृतांवर अंत्यसंस्कार

दरम्यान, या रक्तरंजित संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या नगरसेवक शेख अन्वर शेख अली आणि आरिफ खान हारून खान पठाण यांच्या मृतदेहांवर उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मृतांच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, समर्थक आणि नागरिकांची उपस्थिती होती. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील वातावरण अद्यापही तणावपूर्ण आहे.

राजकीय पार्श्वभूमीचाही तपास

या घटनेतील मृतांपैकी एकजण शिवसेना (शिंदे गट)चा विद्यमान नगरसेवक, तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)शी संबंधित पदाधिकारी असल्याने या संघर्षाला राजकीय संदर्भही प्राप्त झाला आहे. मात्र, या हल्ल्यामागे प्रत्यक्ष राजकीय वैमनस्य होते की वैयक्तिक/स्थानिक वादातून संघर्ष वाढला, याचा स्वतंत्र तपास पोलीस करीत आहेत. 

एका कार्यक्रमातील वादाचे रूपांतर दोन जीव घेणाऱ्या सशस्त्र संघर्षात झाल्याने देऊळगावराजा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या घटनेमागील मूळ कारण, हल्ल्याचे नियोजन कोणी केले, सहभागी आरोपींची नेमकी भूमिका काय होती आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

देऊळगावराजात राजकीय वादातून रक्तरंजित संघर्ष? दोन गट आमनेसामने; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, सात जखमी