शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल! आश्रमशाळेत ‘शिस्ती’चा अजब धडा; विद्यार्थ्यांच्या डोक्यावर प्रयोग अन् रात्रीच्या अंधारात कटींग! मुख्याध्यापक, अधीक्षक व व्यवस्थापनाच्या कारभारावर पालकांचे संतप्त सवाल; चौकशी समिती नियुक्त, निलंबनाची प्रक्रिया सुरू
शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल!
आश्रमशाळेत ‘शिस्ती’चा अजब धडा; विद्यार्थ्यांच्या डोक्यावर प्रयोग अन् रात्रीच्या अंधारात कटींग!
मुख्याध्यापक, अधीक्षक व व्यवस्थापनाच्या कारभारावर पालकांचे संतप्त सवाल;
चौकशी समिती नियुक्त, निलंबनाची प्रक्रिया सुरू
चंद्रपूर/वृत्तसेवा
विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी असलेल्या आश्रमशाळेतच जर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ‘शिस्ती’च्या नावाखाली कात्री चालत असेल, तर या कारभाराला शिस्त म्हणायचे की मनमानी, असा संतप्त सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय आश्रमशाळेत तब्बल ७२ ते ५०० विद्यार्थ्यांचे अर्धवट केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शिक्षणव्यवस्थेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी कटींग करताना ट्रिमरची बॅटरी संपली आणि काही विद्यार्थ्यांची कटींग अर्धवट राहिली. परिणामी काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस एकीकडे कापलेले तर दुसरीकडे तसेच राहिले. विद्यार्थ्यांना अशा विद्रूप अवस्थेत बसवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली. काही विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र शाळेच्या कारभाराची लक्तरेच वेशीवर टांगली गेली.
दुपारची ‘शिस्त’ रात्री ४ वाजेपर्यंत!
विशेष म्हणजे, कटींग अर्धवट राहिल्यानंतर विद्यार्थ्यांना रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत उठवून पुन्हा केस कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अशा प्रकारे उठवून कटींग करण्याची वेळ का आली? ट्रिमरची बॅटरी संपली म्हणून विद्यार्थ्यांच्या झोपेचा, मानसिक स्थितीचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा विचार करण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल आता पालक विचारत आहेत.
‘शिस्त’ लावण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दिवसा अपमानास्पद अवस्थेत बसवणे आणि नंतर मध्यरात्री कटींग करणे, हा शिस्तीचा कोणता नवा नमुना आहे, असा उपरोधिक सवालही उपस्थित होत आहे.
कोंडा होता की ‘शिस्ती’च्या नावाखाली मनमानी?
विद्यार्थ्यांच्या डोक्यावर खाज अथवा कोंडा असल्याचा दावा शाळा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र काही पालकांच्या म्हणण्यानुसार, खेळणे किंवा शिस्तीचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांचे केस बळजबरीने विद्रूप पद्धतीने कापण्यात आले. त्यामुळे नेमके सत्य काय, हे चौकशीत स्पष्ट होणे गरजेचे आहे.
अधीक्षक प्रशांत आत्राम यांनी मात्र आरोप फेटाळून लावत दरमहा नियमित कटींग केली जाते आणि केवळ ट्रिमरची बॅटरी संपल्यामुळे काही विद्यार्थ्यांची कटींग अर्धवट राहिल्याचा दावा केला आहे.
मुख्याध्यापकांच्या ‘नजरेसमोर’ काय चालले होते?
या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी संबंधित अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र पालकांचा सवाल याहूनही मोठा आहे—हा प्रकार शाळेत घडत असताना मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची यंत्रणा नेमकी कुठे होती?
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करण्यापुरती आहे का? विद्यार्थ्यांच्या सन्मानाची, मानसिक सुरक्षिततेची आणि रात्रीच्या वेळेतील सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांचा आत्मसन्मान दुखावला जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांना घडविण्याचे ठिकाण; त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची टिंगल होईल किंवा त्यांना मानसिक त्रास होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे ठिकाण नव्हे.
शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या हिताचे भान ठेवण्याऐवजी जर केवळ ‘प्रकार मिटविण्याची’ धावपळ केली असेल, तर ही बाबही चौकशीच्या कक्षेत येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे केस पुन्हा कापून देणे हा उपाय असू शकतो; पण त्यांच्या मनावर उमटलेला अपमानाचा ठसा कोण पुसणार?
चौकशी समिती; निलंबनाची प्रक्रिया सुरू
आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकारी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत. प्राथमिक अहवालाच्या आधारे अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावर निलंबनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आता खरी परीक्षा चौकशी समितीची आहे. ट्रिमरची बॅटरी संपल्यामुळे कटींग अर्धवट राहिली की ‘शिस्ती’च्या नावाखाली विद्यार्थ्यांवर मनमानी करण्यात आली, रात्रीच्या वेळी कटींग करण्याचा निर्णय कोणी घेतला, मुख्याध्यापक व व्यवस्थापनाची या संपूर्ण प्रकारातील जबाबदारी काय आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे पालकांना मिळणे आवश्यक आहे.
कारण, आश्रमशाळा ही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कात्री चालविण्याची जागा नाही; ती त्यांच्या भविष्याला आकार देण्याची जबाबदारी असलेली संस्था आहे. या जबाबदारीत कसूर झाली असल्यास केवळ कागदी नोटीस नव्हे, तर दोष निश्चित करून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

टिप्पण्या