अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरूच ..

अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरूच ..
पुन्हा दोन वाहने पकडली

रेतीमाफियांंच्या अवैध कारनामे उखडून फेकण्यासाठी मुळावर घाव घालणे शक्य ..




सिंदखेडराजा:- अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी दोन वाहने पकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे. मात्र  जेथून रेती उत्खनन करुन वाहतूक करण्यात येते त्यागावतच कारवाई का केल्या जात नाही? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे.
तालुक्यातील जळगाव येथे दि. २५ एप्रिल रोजी सूर्योदयापूर्वीच नंबर नसलेले एक टिप्पर रेती वाहतूक करतांना आढळले. त्यावेळी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व मंडळाधिकारी रविंद्र घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकातील तलाठी गजानन टेकाळे, श्रीमंत पांडव, प्रवीण झिने, ब्रम्हानंद साळवे यांनी त्यास थांबवून विचारणा केली असता चालक सय्यद अहमद सय्यद अजगर व मालक शिवप्रसाद उद्धव मांटे, दोघेही रा. डिग्रस, ता. देऊळगावराजा यांच्याजवळ रॉयल्टी व वाहतूक पास आढळून आली नाही. त्यामुळे तीन ब्रास रेती असलेल्या टिप्परचा पंचनामा करीत सिंदखेडराजा पोलिसांच्या सुपूर्द केले.
तसेच दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास किनगावराजा नजीकच्या पाताळगंगा नदीतून एक ब्रास रेती उत्खनन व वाहतूक करणारे एक नवेकोरे नंबर नसलेले ट्रॅक्टरही आढळले. यामध्येही ट्रॅक्टर चालक पवन रामेश्वर मुंढे व मालक अभिजीत अरुण राजेजाधव यांच्याकडेही रॉयल्टी व वाहतूक पास नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महसूल पथकातील तलाठी गजानन टेकाळे, श्रीमंत पांडव, राहुल देशमुख, कोतवाल ज्ञानेश्वर ढाकणे पंचनामा करीत ट्रॅक्टर किनगावराजा पोलीस ठाण्यात जमा केले आहे.


मुळावर घाव घालणे शक्य ..


खडकपूर्णा नदीतून उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संदर्भात गावाच्या नावात डिग्रस, ता. देऊळगावराजा हेच नाव समोर येत आहे. त्यामुळे तेथेच कारवाई करीत मुळावरच घाव का घातल्या जात नाही? हा प्रश्न जनतेत चर्चेत येत आहे.


नंबर नसलेली वाहने ..


ज्या वाहनांतून अवैध रेती वाहतूक केल्या जाते, त्या वाहनांना नंबर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीकाठी असलेल्या गावातील वाहनांचा सर्व्हे करुन त्यांच्यावर पातळ ठेवल्यास रेतीमाफियांची कोंडी केल्या जाऊ शकते.



झारीतील शुक्राचार्य काढले बाजूला ..


अवैध रेती उत्खनन करुन वाहतूक करणारी मंडळी नेमकी कोणती आहे. तसेच ते कोणत्या प्रकारे कार्य करतात. याची सर्वच खडानखडा माहिती असलेली काही मंडळी ही यंत्रणेत होती. ते सर्व आतल्या बातम्या लिक करुन रेतीमाफियांना सहकार्य करीत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याने डोळे उघडे ठेवूनही सर्वसामान्य निमूटपणे पहायचे. मात्र या वाघासारख्या वीर मंडळीला आता या पथकातून खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आल्याने कारवाया व्यवस्थित होतील असा कयासही व्यक्त होत आहे.


त्या टिप्परला ठोठावला एक लाखाच्यावर दंड ..


यापूर्वी २४ एप्रिल रोजी दरेगाव येथे पकडण्यात आलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या  टिप्परला १ लाख १६ हजार ५०० रु. चा दंड ठोठावण्यात आला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला