खडकपूर्णा नदीतील उपसून साठवलेला रेतीसाठा जप्त करण्याच्या धडक कारवाईला सुरुवात .. रेतीमाफियांंना हादरा ..
खडकपूर्णा नदीतील उपसून साठवलेला रेतीसाठा जप्त करण्याच्या धडक कारवाईला सुरुवात ..
रेतीमाफियांना हादरा
सिंदखेडराजा:- खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसत माफियांनी ती काठांवरील गावांमध्ये ठिकठिकाणी साठवून ठेवली होती. महसूल विभागाने काल दि. ११ एप्रिल, शनिवारपासून ही रेती जप्त करीत ताब्यात घेणे तढेगावपासून सुरु केले आहे. ह्या प्रक्रियेत किती साठा जप्त होतो? तसेच काहींना सुटका मिळते की काय? अशा स्वरुपाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील डिग्रस ते लिंगा - देवखेड अशी २० किमी पर्यंत लांब खडकपूर्णा नदीपात्र आहे. महसूल विभागाच्या पथकांच्या नाकावर टिच्चून त्यातून माफियांनी अवैध रेती उपसा करण्याचा सपाटा लावला होता. नव्हेतर काठावरील परिसरात त्याचे साठेही करुन ठेवले होते. यासंदर्भात दै. दिव्यमराठीने दि. २४ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी हे साठे जप्त करण्यात येतील तसेच अवैध रेती उपसा करण्यासाठी शेतातून नदीत उतरणारा रस्ता तयार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविण्यात येईल, असा सज्जड इशारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी दिला होता. मात्र कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तडकाफडकीने कारवाई करण्यात आली नाही. तरीही काल दि. ११ एप्रिल, शनिवारी दुपारी तढेगाव येथून अवैध साठा जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हरी वीर, मंडळाधिकारी भारत वाघ, तलाठी झिने, गिरी, घरजाळे, हजारे, राहुल देशमुख, पांडव, वायाळ, आटोळे यांच्यासह बीट जमादार सरकटे यांच्या पथकाने कामगिरी बजावली. तढेगाव येथील अवैध रेतीसाठा सुमारे ७० ब्रास असल्याचा अंदाज आहे. आज तढेगावसह राहेरी येथील रेतीसाठा जप्त करण्याची कारवाई सुरु असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले आहे. तर अजूनही साठेगाव, निमगाव वायाळ, बारलिंगा, हिवरखेड, राहेरी बु, ताडशिवनी, जऊळका, पिपंळगाव कुडा व लिंगा, देवखेड आदि गावातील साठे जप्त करण्यात आलेले नाहीत. माफियांकडून जर ते हलविण्याचा प्रयत्न झाला तर महसूल पथक हाणून पाडील, असा आशावाद तहसीलदार व्यक्त करीत आहेत.
मात्र मागे महसुलचेच पथक कार्यरत असतांनाही हा साठा निर्माण झालेला असल्याने साशंकतेचा सूर काठावरील ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.
बोजा चढविण्याची कारवाई अंतिम टप्प्यात ..
नदीकाठावरील ज्या शेतकऱ्यांनी पात्रात वाहने उतरवण्यासाठी माफियांना रस्ते करुन दिले होते. त्यांच्या सातबाऱ्यावरील बोजे चढविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी दिव्यमराठीशी बोलतांना सांगितले.
रेतीसाठा जप्तीची कारवाई सुरु असताना
दै. दिव्यमराठी मध्ये दि. २४ मार्च रोजी प्रकाशित वृत्त


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏