बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतातील विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतातील विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
सिंदखेडराजा:- शेतात बांधलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला १५ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दि. १८ एप्रिल, शनिवारी दुपारी तालुक्यातील वर्दडी बु. येथे घडली. ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वर्दडी बु. येथील रामप्रसाद ज्ञानदेव काकडे, वय ४२ वर्षे यांच्याकडे गट नं ३ मध्ये ३ एकर शेती असून त्यामध्ये विहीर आहे. सर्व कुटुंबीय घरी असले की शेतातील त्यांच्या बैलांना पाणी पाजण्यासाठी १५ वर्षांचा मुलगा धनुर्धर व मुलगी नामे भक्ती यांना ते अधूनमधून पाठवायचे. त्याप्रमाणे काल दि. १८ एप्रिल, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलगा धनुर्धर यास बैलांना पाणी पाजण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर काही वेळाने रामप्रसाद काकडे यांच्या शेतशेजारील रस्त्यावरुन त्यांचा मित्र लक्ष्मण निकाळजे हे रस्त्याने जात असतांना त्यांना विहिरीवर फक्त बैलच उभे असलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता धनुर्धर हा बुडत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने रामप्रसाद काकडे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तुझा मुलगा विहिरीत बुडत आहे. त्यामुळे मदतीसाठी तू लोकांना सोबत घेऊन ये असा निरोप दिला. त्यावेळी रामप्रसाद काकडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता भाचा अनिरुद्ध सोपान उबाळे व शेजारच्या शिवाजी रामकिसन आटोळे यांना सोबत घेत विहीर गाठली. धनुर्धर ह्यास विहिरीबाहेर काढत तातडीने सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी जय आघाव यांनी धनुर्धरच्या फुफ्फुसात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निदान केले. यासंदर्भात किनगावराजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏