ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श : पिंप्री खंदारेच्या अक्षय कांबळे यांची सोळा लाखांच्या शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी भरारी

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श : 

पिंप्री खंदारेच्या अक्षय कांबळे यांची 

सोळा लाखांच्या शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी भरारी 

अक्षय कांबळे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करतांना ग्रामस्थ 



सिंदखेडराजा – ग्रामीण भागात राहूनही जिद्द, कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाची प्रबळ इच्छा असेल, तर कोणतेही यश अशक्य नसते, हे पिंप्री खंदारे येथील अक्षय पांडुरंग कांबळे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट्स (IIHS), बेंगळुरू येथे Human Development Policy and Practice या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली असून, त्यांना शिक्षणासाठी तब्बल सोळा लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांचे हे यश आज ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अक्षय यांनी प्रतिकूल परिस्थितीला कधीही अडथळा मानले नाही. पिंप्री खंदारे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर पुणे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर हा मान मिळवला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, प्रोत्साहन, संस्कार तसेच एकलव्य संस्थेचे राजू केंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आज अनेक पालक आर्थिक अडचणीमुळे मुलांच्या उच्च शिक्षणाबाबत साशंक असतात. मात्र अक्षय यांचे उदाहरण सांगते की, योग्य माहिती, सातत्यपूर्ण अभ्यास आणि उपलब्ध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेतल्यास उच्च शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास प्रोत्साहन द्यावे, असा संदेश या यशातून मिळतो.

ग्रामीण, तांडे, वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता स्पर्धात्मक शिक्षणाच्या प्रवाहात आत्मविश्वासाने सहभागी व्हावे. मेहनत, चिकाटी आणि योग्य दिशा मिळाल्यास जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे शक्य आहे, हे अक्षय यांनी दाखवून दिले आहे.

अक्षय कांबळे यांचे यश हे केवळ एका विद्यार्थ्याचे यश नसून संपूर्ण ग्रामीण समाजाच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा देणारे आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल, तर पालकांनाही शिक्षण हीच सर्वात मोठी गुंतवणूक असल्याची जाणीव अधिक दृढ होईल.

अक्षय यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकऱ्यांसह विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला