देऊळगावराजा शहरात मोकाट जनावरांचा विळखा; संतोष टॉकीज चौकात वाहतूक धोक्यात, प्रशासनाची झोप कधी उडणार?
देऊळगावराजा शहरात मोकाट जनावरांचा विळखा;
संतोष टॉकीज चौकात वाहतूक धोक्यात,
प्रशासनाची झोप कधी उडणार?
देऊळगावराजा :-
दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात शिवारात पेरण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी काटेरी कुंपण उभारतात किंवा मोकाट जनावरांना शेतातून हुसकावून लावतात. परिणामी ही जनावरे शहराकडे धाव घेतात. शहरात आल्यानंतर संतोष टॉकीज चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी समूहाने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या मोकाट जनावरांमुळे परिसरातील दुकानदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानांसमोर जनावरांचा वावर, रस्त्यावर होणारी घाण, दुर्गंधी आणि ग्राहकांना होणारा मनस्ताप यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक वाहनचालकांना जनावरांना चुकवत वाहन चालवावे लागत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
विशेष म्हणजे, ही जनावरे कोणाची आहेत, याची माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असतानाही त्यांच्यावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. नगरपरिषद आणि पशुसंवर्धन (पशुवैद्यकीय) विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवून संबंधित पशुमालकांना तातडीने नोटिसा द्याव्यात. जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना जबाबदार धरणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
नागरिकांनी असा इशाराही दिला आहे की, सूचना देऊनही पशुमालकांनी जनावरे ताब्यात घेतली नाहीत, तर संबंधित मोकाट जनावरे जप्त करून परिसरातील गोशाळांमध्ये सुपूर्द करण्यात यावीत. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही.
प्रशासनासाठी सवाल :
- संतोष टॉकीज चौकात रोज दिसणारी मोकाट जनावरे प्रशासनाला दिसत नाहीत का?
- अपघात झाल्यानंतरच कारवाई करण्याची परंपरा कधी थांबणार?
- नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?
शहरातील मुख्य चौक मोकाट जनावरांच्या ताब्यात जात असताना प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर केवळ पंचनामा आणि बैठका घेण्यापलीकडे काहीही उरणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.




टिप्पण्या