सिंदखेडराजा येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न
सिंदखेडराजा येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने हा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक तसेच विविध विभागांच्या यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
बैठकीत प्रा. संजय खडसे यांनी सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षकांना कामकाजाचा वेग वाढविण्यासह पारदर्शकता आणि अचूकतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी घरभेटी घेऊन नवीन मतदारांची नोंदणी करणे, वारस नोंदणी करणे, स्थलांतरित मतदारांची पडताळणी करणे तसेच पात्र नागरिकांना मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय मतदार यादीतील मृत मतदारांची नावे, दुबार नोंदी आणि चुकीची माहिती शोधून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी शुद्धीकरणासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
डिजिटल प्रणालीच्या प्रभावी वापराबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘एन्युमरेशन फॉर्म’ (Enumeration Form) नागरिकांना वितरित करून तो आवश्यक कागदपत्रांसह भरून घेणे, त्यानंतर ही माहिती ‘ERONET’ प्रणालीवर स्कॅन करून अपलोड करणे आणि सर्व माहिती वेळेत अद्ययावत ठेवणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
मतदारांच्या सुनावणीसंदर्भातील नोटीसा बजावणे, त्याबाबतचे अहवाल संबंधित मोबाईल अॅपवर वेळेत अपलोड करणे आणि प्रत्येक टप्प्याचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यावरही भर देण्यात आला.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार या मोहिमेचा पहिला टप्पा ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून या कालावधीत सर्व प्राथमिक कामे पूर्ण करणे बंधनकारक असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दावे व हरकती स्वीकारणे, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करणे, आवश्यक नोटीसा बजावणे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या विशेष मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली आणि लोणार येथील गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक चालक व संबंधित कर्मचाऱ्यांनी या कामात सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी आवश्यक निर्देश देण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. निवडणूक आयोगाचे हे महत्त्वपूर्ण कार्य वेळेत, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.
या बैठकीस तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे, तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी सिंदखेडराजा अजित बांगर, गटविकास अधिकारी लोणार श्री. देशमुख, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार संदीप बंगाळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख रचना जाधव, गट शिक्षण अधिकारी सिंदखेडराजा स्वप्नील निकम, सहाय्यक महसूल अधिकारी नागेश खरात, सहाय्यक महसूल अधिकारी रामेश्वर कहाळे, गट शिक्षण अधिकारी देऊळगाव राजा गणेश देशमुख, महसूल सहाय्यक संजय सोनुने, तालुका अध्यक्ष राजूभाऊ खरात तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या