फेसबुकवरील मैत्री पडली महागात; ट्रेडिंगमधून बख्खळ कमाईचे आमिष; नाशिकमध्ये तिघांची ३७.९१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

फेसबुकवरील मैत्री पडली महागात; 

ट्रेडिंगमधून बख्खळ कमाईचे आमिष 

नाशिकमध्ये तिघांची ३७.९१ लाखांची ऑनलाइन फसवणूक


नाशिक : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत ट्रेडिंग व्यवसायातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकमधील एका सेवानिवृत्त व्यक्तीसह तिघांची तब्बल ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त व्यक्तीला जुलै २०२५ मध्ये फेसबुकवर 'अंजली अग्रवाल' नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. संबंधित महिलेने आपल्या प्रोफाइलमध्ये पश्चिम बंगालमधील एका नामांकित कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असल्याचे नमूद केले होते.

सुरुवातीला फेसबुकवर साध्या गप्पांमधून ओळख वाढली. त्यानंतर दोघांमधील संवाद व्हॉट्सअॅपवर सुरू झाला. विश्वास संपादन केल्यानंतर महिलेने ऑनलाइन ट्रेडिंगमधून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच मोठा नफा झाल्याचे कथित स्क्रीनशॉटही पाठवून सेवानिवृत्त व्यक्तीला गुंतवणुकीस प्रवृत्त केले.

महिलेच्या सांगण्यावरून पीडिताने एका ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली. त्यासाठी बँक खाते, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी माहिती भरावी लागली. सुरुवातीला सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. त्यानंतर विविध यूपीआय आयडी आणि बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ या चार महिन्यांत पीडित व्यक्तीने ६० हून अधिक व्यवहारांद्वारे २७ लाख ५६ हजार १६४ रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. याच पद्धतीने आणखी दोन जणांचीही फसवणूक करण्यात आली. त्यामुळे एकूण फसवणुकीची रक्कम ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपये इतकी झाली.

गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील व्यवहार संशयास्पद वाटू लागल्यावर संबंधित व्यक्तीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाशिक शहर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१८(४) व ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले व्हॉट्सअप क्रमांक, यूपीआय आयडी आणि बँक खात्यांचा शोध सायबर पोलिस घेत असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांसाठी सायबर पोलिसांचा इशारा

  • सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
  • कमी कालावधीत मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याच्या आश्वासनांना बळी पडू नका.
  • अनोळखी लिंकवर क्लिक करून बँक खाते, पॅन, आधार किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
  • संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!