संभाजीनगर हादरले; नापास केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला

संभाजीनगर हादरले;

नापास केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला


संभाजीनगर | प्रतिनिधी

संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील एका शाळेत नववीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकावर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक करून बालगृहात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी नववीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला नव्हता. मंगळवारी दुपारी तो शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) घेण्यासाठी शाळेत आला होता. यावेळी मुख्याध्यापकांनी त्याला आवश्यक अर्ज भरून देण्यास तसेच शाळेची थकबाकी जमा करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थ्याने अर्ज भरण्यास नकार दिला. अर्जाशिवाय दाखला देता येणार नसल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केल्यानंतर त्याने आपल्या वर्गशिक्षकांना कार्यालयात बोलावण्याची मागणी केली.

मुख्याध्यापकांच्या दालनात चर्चा सुरू असताना विद्यार्थ्याने अचानक संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. "तुम्हीच मला मुद्दाम विज्ञान आणि गणित विषयात नापास केले. त्यामुळे माझे संपूर्ण वर्ष वाया गेले," असा आरोप करत त्याने शिक्षकांना शिवीगाळ केली. मुख्याध्यापकांनी त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणतेही स्पष्टीकरण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

चर्चेदरम्यान अचानक विद्यार्थ्याने आपल्या जवळील धारदार चाकू बाहेर काढला आणि "मी तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत वर्गशिक्षकाच्या पोटात वार केला. हल्ला इतका अचानक झाला की उपस्थितांना काही कळण्यापूर्वीच शिक्षक गंभीर जखमी झाले.

मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून आरडाओरडा ऐकून इतर शिक्षक व कर्मचारी मदतीसाठी धावत आले. मात्र, विद्यार्थ्याने त्यांच्याकडेही चाकू रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे काही काळ शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर त्याने जखमी शिक्षकाला कार्यालयातच अडकवून ठेवले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, शाळेत उपस्थित असलेल्या एका पालकाच्या मदतीने जखमी शिक्षकांना तातडीने घाटी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विवेक जाधव आणि उपनिरीक्षक काकासाहेब नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान आरोपी विद्यार्थी गवळीपुरा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला बालगृहात दाखल करण्यात आले.

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू विद्यार्थ्याने ऑनलाइन मागविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तो चाकू सोबत घेऊनच शाळेत आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे, ज्या शिक्षकावर हल्ला करण्यात आला ते शाळेत मराठी आणि हिंदी विषय शिकवतात. विज्ञान किंवा गणित विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. मात्र, विद्यार्थ्याचा गैरसमज झाला होता की याच शिक्षकांमुळे तो नापास झाला. हा गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न मुख्याध्यापकांनी केले; परंतु संतप्त विद्यार्थ्याने कोणतेही स्पष्टीकरण ऐकून घेण्यास नकार दिला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नापास झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी एका खासगी रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करत होता. येत्या काही दिवसांत तो एका बालरुग्णालयात नोकरीला रुजू होणार होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्याची आई सांभाळत असून ती स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह करते. विद्यार्थ्याची मोठी बहीण शिक्षिका आहे, तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलिसांकडून सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला