समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! सिमेंट मिक्सर ट्रक पलटी; अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या २५ हून अधिक कार एकमेकांवर आदळल्या सुदैवाने जीवितहानी टळली; अनेक वाहनांचे मोठे नुकसान, अपघातस्थळी वाहतुकीचा खोळंबा
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका!
सिमेंट मिक्सर ट्रक पलटी;
अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या २५ हून अधिक कार एकमेकांवर आदळल्या
सुदैवाने जीवितहानी टळली;
अनेक वाहनांचे मोठे नुकसान,
अपघातस्थळी वाहतुकीचा खोळंबा
हिवरखेड पूर्णा, दुसरबीड, तढेगाव : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिवरखेड पूर्णा ते तढेगाव दरम्यान चॅनल क्रमांक ३२१.९०० वरील पुलावर सिमेंट मिक्सिंग ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक बॅरिगेट्सला धडकून पलटी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी निर्माण झालेल्या गोंधळात मागून येणाऱ्या वाहनांची एकमेकांना धडक बसली. विशेष म्हणजे, अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या कारच्या रांगेला मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने तब्बल २५ हून अधिक कारचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, इमरान अन्सारी मिराज अन्सारी (वय २४, रा. पनवेल) हा चालक अमरावती येथून मुंबईच्या दिशेने सिमेंट मिक्सिंग ट्रक घेऊन जात होता. शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास हिवरखेड पूर्णा ते तढेगावदरम्यान समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३२१.९०० वरील पुलावर अचानक ट्रकवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक महामार्गाच्या बाजूला असलेल्या बॅरिगेट्सला जोरदार धडक देऊन रस्त्यावर पलटी झाला. या घटनेने महामार्गावरील वाहतुकीत एकच खळबळ उडाली.
अपघात पाहण्याच्या उत्सुकतेत कारच्या लांबच लांब रांगा!
सिमेंट मिक्सिंग ट्रक पलटी झाल्यानंतर त्याच मार्गाने मागून येणाऱ्या काही कारची ट्रकला धडक बसली. सोनोशी येथील गजानन नागरे हे पुणे येथे जात असतांना, गाडी थांबवून ट्रकचालकास बाहेर काढले. ट्रकमधील सिमेंट अपघातामुळे सर्वत्र विखुरले गेल्याने रस्त्यावर दिसणे अंधुक झाले होते. याचवेळी रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून, अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्यासाठी मागून येणारी वाहने थांबविली गेली. तसेच हा अपघात पाहून नेमके काय घडले, अपघातग्रस्तांना मदतीची गरज आहे का, याची माहिती घेण्यासाठी तसेच उत्सुकतेपोटी अनेक कारचालकांनी आपली वाहने थांबवली. परिणामी अपघातस्थळाच्या परिसरात कारच्या रांगा लागल्या. मात्र, हीच बाब पुढील मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरली.
कारची रांग लागलेली असतानाच मागून वेगाने येणाऱ्या एका ट्रकने रांगेतील कारना जोरदार धडक दिली आणि धडक दिल्यानंतर तो ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेमुळे रांगेतील उभ्या असलेल्या कार एकापाठोपाठ एक पुढील वाहनांवर आदळल्या. त्यामुळे अनेक कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात नुकसान झालेल्या कारची संख्या २५ पेक्षाही अधिक असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
काही कारचालक निघून गेल्याने वाहनांची नेमकी संख्या अस्पष्ट!
या घटनाक्रमात काही कारचे मोठे नुकसान झाले, तर काही वाहनांना किरकोळ खरचटले. किरकोळ नुकसान झालेल्या काही कारचालकांनी घटनास्थळावरून पुढील प्रवास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या साखळी अपघातात नेमक्या किती कारचे नुकसान झाले, याची निश्चित संख्या समोर येणे कठीण झाले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा संबंधित यंत्रणांच्या पाहणीनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलीस व आरोग्य विभागाची घटनास्थळी धाव; गंभीर दुखापत नाही!
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील किरकोळ जखमींना वैद्यकीय उपचार देण्यास सुरुवात करण्यात आली. सुदैवाने या संपूर्ण घटनाक्रमात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक आणि कार महामार्गाच्या बाजूला हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत एका बाजूने वाहतूक सुरू ठेवली.
सुमारे पंधरा व्यक्ती जखमी
ह्या अपघातात सुमारे पंधरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, त्यातील पाच जालना येथे तर चार व्यक्ती सिंदखेडराजा येथे उपचार घेत आहेत.
तर किरकोळ जखमी झालेल्यांवर अपघातस्थळी आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी उपचार करण्यात आला.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी केली मदत
ह्या मार्गाने माजी मंत्री राजेश टोपे हे प्रवास करीत होते. अपघाताची घटना बघताच त्यांनी अपघातातील कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह मदत केली.

अपघाती कार मधील जखमींना बाहेर काढतांना माजी मंत्री राजेश टोपे
अपघात पाहण्यासाठी वाहन थांबविणे ठरू शकते जीवघेणे!
समृद्धी महामार्गावर घडलेल्या या घटनाक्रमातून एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर एखादा अपघात घडल्यास केवळ उत्सुकतेपोटी आपले वाहन रस्त्यावर थांबवून अपघात पाहणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. मदतीची भावना महत्त्वाची असली, तरी त्यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण न करता सुरक्षित अंतर राखणे आणि आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा एका अपघातातून अनेक वाहनांच्या अपघातांची साखळी निर्माण होऊन निष्पाप प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

टिप्पण्या