नवजात बाळ विक्री प्रकरणाचा तपास अधिक गतीमान; दोन महिलांना अटक, संबंधित राजकीय चर्चांना उधाण
नवजात बाळ विक्री प्रकरणाचा तपास अधिक गतीमान;
दोन महिलांना अटक, संबंधित राजकीय चर्चांना उधाण
चंद्रपूर/वृत्तसेवा
चंद्रपूर शहरातील नवजात बाळ विक्री प्रकरणाचा तपास अधिक गतीमान झाला असून, या प्रकरणात आणखी दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे अशी असून, त्या स्थानिक भाजपच्या राजकीय वर्तुळाशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र भाजपने यासंदर्भात भूमिका घेतलेली नाही. पोलिसांनी दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे समजते.
रामनगर पोलिसांनी मे २०२६ मध्ये नवजात बालकांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले होते. तपासात एका अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची पैशांच्या मोबदल्यात विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. या प्रकरणात मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित मुलीची आई तसेच बाळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या महिलांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आरोपींवर मानवी तस्करी तसेच पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान काही कागदपत्रांची पूर्तता, प्रक्रिया आणि समन्वयाच्या अनुषंगाने सायली येरणे व भाग्यश्री हांडे यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांची साक्षीदार म्हणून नोंद करण्यात आली होती; मात्र तपासात संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या असून, विरोधी पक्षांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित महिलांवरील आरोपांबाबत किंवा त्यांच्या पक्षीय भूमिकेबाबत भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयीन प्रक्रिया संपेपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

टिप्पण्या