CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
CRIME ..
दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ
तालुक्यातील धक्कादायक घटना,
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सिंदखेडराजा:- तालुक्यातील एका गावात दोन अल्पवयीन मुलांनी एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी दि. २४ डिसेंबर रोजी तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संस्कार, सामाजिक जाणीव आणि बालसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. “इतक्या लहान वयात अशी विकृती कशी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुलीच्या ३५ वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील एका गावात, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शेजारी हे कुटुंब वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजता ११ वर्षीय मुलगी घरात एकटी झाडझुड करीत असताना, शेजारी राहणारे अंदाजे १४ व १५ वर्षे वयाचे दोन अल्पवयीन मुलगे तिच्या घरी आले.
यावेळी १४ वर्षीय मुलाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर १५ वर्षीय मुलगा बाहेर राखण करत उभा होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुलीने आपल्या आईला दोन्ही मांड्यांच्या मध्ये दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे आईला संशय येऊन तिने मुलीला विश्वासात घेत विचारणा केली असता, मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला.
यानंतर आईने तत्काळ तालुक्यातील पोलिस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसमोर तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अप.क्र. ३५४/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(i), ६५(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत दोन्ही अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार व त्यांचे सहकारी करत आहेत.
एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची ही घटना केवळ गुन्हा न राहता, समाजमनाला अंतर्मुख करणारी ठरली आहे. वाढती बालविकृती, पालकांचे दुर्लक्ष, मोबाईल व डिजिटल संस्कृतीचा प्रभाव आणि सामाजिक जबाबदारी यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली असून, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏