मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज व नापिकी या चिंतेतून वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
सिंदखेडराजा:- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील वयोवृद्ध शेतकरी बाबुराव श्रीराम देशमुख यांनी सततची नापिकी व मुलीच्या लग्नाचे डोक्यावरील कर्ज या चिंतेपोटी स्वतःच्या शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
यासंदर्भात मृतक शेतकऱ्याचा पुतण्या अमोल संजयराव देशमुख (वय ३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बाबुराव श्रीराम देशमुख वय ६१ वर्षे, हे आज दि. २९ डिसेंबर २०२५, सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील मोटर पंप चालू करण्यासाठी गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःच्याच शेतातील उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत काहींना दिसले, त्यावरुन मिळालेल्या मोबाईल कॉल व संदेशानुसार मी शेतात जाऊन खात्री केली असता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
माझे काका बाबुराव श्रीराम देशमुख, रा. मलकापूर पांग्रा यांच्यावर बँकेचे कर्ज होते. मुलीचा लग्नाच्या कर्जाचा भार डोक्यावर असल्यामुळे आणि सलग दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात पीक निघत नसल्याने कर्जफेडीची चिंता वाढत चालली होती. या चितेमध्ये ते सतत असायचे. त्यामुळे विमनस्क होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे? असे ग्रामस्थांच्या चर्चेतून समजते.
मृतक बाबुराव देशमुख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे, पतवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड, पीएसआय गणेश डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार व पोलिस करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏