विहीर अस्तित्वात असतांनाही तलाठ्याने केली नोंद गायब शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण न्याय कधी मिळतो? याकडे लक्ष
विहीर अस्तित्वात असतांनाही तलाठ्याने केली नोंद गायब
शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण
न्याय कधी मिळतो? याकडे लक्ष
सिंदखेडराजा:- तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीची असलेली नोंद तलाठ्याने सातबारा उताऱ्यावरून चक्क गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याने तलाठ्यास प्रत्यक्ष भेटून, नव्हेतर तहसीलदार यांनाही निवेदन दिले. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. शेवटी आता त्या शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, त्यावर कारवाई होते की नाही? याबाबत शेतकरी वर्गात शंकाकुशंकात्मक चर्चेला उधाण आले आहे.
पिंपळगाव सोनारा येथील प्रल्हाद बजेबा पंजरकर यांची शेती गावानजीक परंतु, चिखली तालुक्यातील मेरा बु. शिवारातील गट नंबर ५९१ मध्ये आहे व शेतीचे महसूल खाते सुध्दा मेरा बु. च्या रेकॉर्ड मध्ये आहे. त्याच शेतामध्ये पूर्वापार विहीर आहे. त्याची नोंद सुध्दा महसूल दप्तरात होती. परंतु 'आले तलाठ्यांच्या मना तेथे कुणाचेही चालेना' या उक्तीनुसार कुठलीही सूचना न देता, पंचनामा न करता, अगदीच बेकायदेशीरपणे तलाठ्याने त्या विहीरीची नोंदच सातबारा उताऱ्यावरुन गायब केली. यासंदर्भात नोंद कायम ठेवण्यात यावी, अशी तलाठ्यांना विनंती करुनही माझे कुणीच काही वाकडे करु शकत नाही, असे म्हणत कुठे जायचे ते जा, परंतु पहिल्यासारखी नोंद होणार नाही असे उर्मट उत्तर शेतकरी प्रल्हाद पंजरकर यांना दिले. त्यानंतर दि. ४ डिसेंबर, गुरुवारी चिखली तहसीलदार यांना लेखी स्वरुपात तक्रार अर्ज दिला व विहीरीची नोंद पूर्वीच्या प्रमाणे कायम ठेवण्याची विनंती केली. परंतु त्यानंतरही कुठलीच शासकीय हालचाल अथवा कारवाई करण्यात आली नाही. म्हणून अगतिक झालेल्या शेतकऱ्याने उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे दि. २२ डिसेंबर, सोमवारी तक्रार अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये शेतात विहीर असून, ती अस्तित्वात आहे यासाठी पंचनामा करण्यात यावा. तलाठ्यांनी कोणत्या कारणाने अथवा अधिकाराने सातबारा उताऱ्याच्या दप्तरातून नोंद वगळली याची चौकशी करण्यात यावी व विहिरीची नोंद करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
महसूल विभागाच्या मनमानी कारभाराच्या अनुभवातून काही शेतकऱ्यांना आलेले वाईट अनुभव व त्यातून न्याय मिळण्यासाठी लागलेला अनेक पिढ्यांचा काळ, अशा अनेक उदाहरणांवरून शंकाकुशंकात्मक चर्चांना उधाण आले आहे.
त्यामुळे आता न्याय मिळतो की नाही? अशी शंका येत असल्याचे मत शेतकरी प्रल्हाद बजेबा पंजरकर यांनी "दीसना" सोबत बोलतांना व्यक्त केले आहे. तर महसूल दप्तरात विहिरीची कधी नोंद होते? याकडे सिंदखेडराजासह चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे, एवढे मात्र नक्की ..!



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏