आणखी दोन शिक्षक अटकेत, आरोपींची एकूण संख्या झाली सात, सोशल मीडियाद्वारे बारावी पेपरफुटी प्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी

 सोशल मीडियाद्वारे बारावी पेपरफुटी प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी 

आज रात्री उशीरा आणखी दोन शिक्षक अटकेत : आरोपींची एकूण संख्या झाली सात


तपासात पोलीस मुख्य सूत्रधार व मास्टर माईंड पर्यंत पोहचणार का?


सिंदखेडराजा:- राज्यभर गाजलेल्या इयत्ता १२ वीच्या गणित पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना दि. १० मार्च, शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर रात्री उशीरा आणखी दोन आरोपी शिक्षकांना लोणार भागातून अटक करण्यात आली असून, आरोपींची एकूण संख्या सात झाली आहे. त्यातून ह्या प्रकरणाचे धागेदोरे तपासत पोलीस ह्या प्रकरणाचा सुत्रधार व मास्टरमाईंड पर्यंत पोहोचण्यात यशस्वी होणार का? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 

राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना दि. ३ मार्च, शुक्रवारी तालुक्यात घडल्याची बाब इलेक्ट्रॉनिक मीडियावर आली होती. त्यानंतर काही मिनिटांच्या अवधित विधानसभा अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात अजितदादा पवार व वर्षा गायकवाड यांनी यावर सरकारला धारेवर धरले होते. त्यातून हा प्रकार संपूर्ण राज्यभरात चर्चेत आला होता. शैक्षणिक यंत्रणेने ताबडतोब हालचाली करीत तालुक्यातील परीक्षा केंद्रे तपासली होती. परंतु हा प्रकार सायबर स्वरुपात असल्याने परीक्षा केंद्र नेमके कोणते? ह्याबाबत साशंकता होती. तरीही शिक्षण विभागाच्यावतीने लिहिलेली तक्रार साखरखेर्डा येथे घेतल्या गेली नाही. त्यामुळे गडबडीत सिंदखेडराजा गाठावे लागून, तेथेही गुन्हा दाखल होण्यासाठी प्रकरण हमरीतुमरीवर येत तक्रारकर्त्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताटकळत ठेवले होते. सरतेशेवटी गुन्हा दाखल झाला. परंतु पोलिसांनी जेथून परत जायला भाग पाडले होते, तेथेच प्रकरण वर्ग करावे लागले. यातून पोलिसांनी जाणूनबुजून टाळाटाळ तर केली नाही ना? अशाही शंकाकुशंका शैक्षणिक वर्तुळात चर्चिल्या गेल्या. मात्र जसा गुन्हा साखरखेर्डा पोलीस ठाण्यात वर्ग झाला तसे पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे ह्यांनी मिळालेल्या माहितीवरुन प्रभावीपणे तपासचक्रे फिरवली. त्यात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्यांना एकमेकांपासून विलग ठेवत चौकशी केली असता, प्रकरणाची उकल झाली. त्याच्या कड्या जुळवत खाजगी संस्थाचालक असलेले शिक्षक गजानन शेषराव आडे, वय ३५ वर्षे, रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, गोपाल दामोधर शिंगणे, वय २९ वर्षे, रा. शेंदूरजन यांच्यासह गणेश बद्रीनाथ पालवे, वय २१ वर्षे, पवन सुधाकर नागरे, वय २४ वर्षे व गणेश शिवानंद नागरे, वय ३० वर्षे तिघेही रा. भंडारी या पाच जणांना आरोपी ठरवत अटक करण्यात आली.

ह्या पाचही आरोपींना आज देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर केले असता मुख्य न्यायाधीश श्री शैलेश कंठे यांनी त्यांना दि. १० मार्च, शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व होत असतांनाच तडफदार ठाणेदार नंदकिशोर काळे व सहकाऱ्यांचा आरोपींचा शोधही सुरुच होता. आज रात्री उशीरा लोणार येथील शाळेवर कार्यरत असलेल्या शेख अकील शेख मुनाफ, रा. लोणार व अंकुश पवार, रा. सावरगाव तेली ह्या दोघांना रात्री १०.०० वा. सुमारास अटक करण्यात आली आहे.

पाच आरोपींना देऊळगावराजा न्यायालयात हजर केले, त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील अधिवक्ता अनिल शेळके यांनी सरकार पक्षातर्फे भरीव युक्तिवाद केला.

त्यामध्ये गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. दोन्ही शिक्षकांनी पूर्वनियोजितपणे कट रचत विद्यार्थ्यांचा गृप स्थापन करुन, त्याद्वारे गणिताचा पेपर सुरु होण्याअगोदर व्हायरल केला. तसेच कुणाच्या ताब्यात असतांना, पेपर कुणी व्हायरल केले? तपासकामी आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी नेणे आवश्यक आहे. यापूर्वीही काही पेपर लिक झाले का? त्याचा तपास करणे. आरोपींच्या मोबाईल वरुन इतरत्र माहिती गेली का? याचे तांत्रिक पुरावे गोळा करणे. तसेच आरोपी शिक्षकांनी खुपिया गृप तयार करुन, त्याद्वारे गणिताच्या पेपरची प्रश्नपत्रिका व्हायरल करीत, विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले का? हा सर्व तपास करणे आवश्यक असल्याचे मुद्दे भरीव स्वरुपात विशद केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला