सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बारावीच्या पेपर फुटी संदर्भात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल ..

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या  बारावीच्या पेपर फुटी संदर्भात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल ..

हा पेपर पुन्हा होणार नाही - बोर्डाचे प्रकटन


सिंदखेडराजा:- राज्यभरात गाजलेल्या सोशल मीडियातून पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे प्रकरण साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही सूतोवाच आहे. तर गणिताचा पेपर पुन्हा होणार नसल्याचे प्रकटन बोर्डाकडून जारी करण्यात आले आहे.

आज दि. ३ मार्च, शुक्रवारी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर होता. तालुक्यातून हा पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून परीक्षेच्या अर्धा तासापूर्वीच फुटल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रकाशित झाली. लगोलग विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात अजितदादा पवार व माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा मुद्दा गाजवला. त्यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे उत्तर दिले. त्यातून ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाचे जगन मुंढे व सिंदखेडराजाचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे आदि तातडीने साखरखेर्डा येथील कस्टोडिअन सेंटरवर पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला पेपर कुठून फुटला हे कळत नसल्याने, त्यांनी त्यानुसार तक्रार अर्ज लिहून साखरखेर्डा पोलीस ठाणे गाठले. मात्र ठाणेदार नंदकिशोर काळे ह्यांनी थातुरमातुर व जुजबी कारणे देत ही तक्रार सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात देण्याचे सुचविले. त्यानंतर मुंढे व गावडे हे सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र तेथेही ठाणेदार  केशव वाघ व काही कर्मचाऱ्यांनी त्यांना तीन तासापेक्षा जास्त वेळ ताटकळत ठेवले. पोलीस ठाण्यात ठिकाणाचे नाव टाकण्यावर वारंवार आग्रह देण्यात आला. त्यानंतर ह्या पेपरफुटी संदर्भात गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांच्या तक्रारीवरुन सिंदखेडराजा पोलिसांनी सायंकाळी ७.३० वा. सुमारास महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ च्या कलम ५ व ६ अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी फिर्यादीत राजेगाव येथील परीक्षा केंद्राचा उल्लेख केला आहे. तसेच हा प्रकार एक वृत्तवाहिनी तसेच एका लाईव्हवर प्रसारित झाल्यामुळे माहीत झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान अमरावती विभागाचे उपसचिव तेजराव काळे यांनी सिंदखेडराजा येथे भेट देत, अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचीही माहिती हाती आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी तो फोटो नेमका कुठल्या मोबाईलवरुन देण्यात आला? हे शोधणे गरजेचे आहे. त्यामुळेच सायबर विभागाने याची तपास सूत्रे हाती घेण्याची गरज आहे. परंतु पोलीस विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी साखरखेर्डा येथून सिंदखेडराजा येथे जाण्याचे सांगण्यात येणे, अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवणे व ठिकाणाच्या उल्लेखासंदर्भात दबाव टाकणे आदि बाबी  पडद्यामागच्या बऱ्याच बाबी सांगून जातात. याचवेळी राजेगाव हे गाव साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या कक्षेत येत असल्याने हे प्रकरण साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल, असेही सूतोवाच आहे. यामागे ज्यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला ते व गृहमंत्रालय ज्यांच्या हाती आहे ते यांचा काही बादरायण संबंध तर नसावा ना? असाही प्रश्न चर्चिला जात आहे.

मीडियाची ब्रेकिंग घाई ..

ब्रेकिंग बातमीसाठी घाईगडबडीत कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता मिळेल ती माहिती घेतल्या जाते. ज्या स्रोतांकडून माहिती घेतोय ते स्रोत विश्वसनीय आहेत की नाही? याचीही तमा बाळगली जात नाही. वेळ लागला तरी चालेल परंतु वाचकांपर्यंत खरी व योग्य माहिती गेली पाहिजे. ह्याच्याशी काही लोकांचे काही एक देणेघेणे नसल्याचे आजच्या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर आलेला पेपर, नेमका कोणत्या परीक्षा केंद्रावरुन फुटला ह्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतांना फक्त सांगोवांगी काही परीक्षा केंद्रांच्या नावांचा उल्लेख केला गेला. त्यातूनच त्या ठिकाणाचे नाव घेत बातम्या प्रसारित झाल्या. पोलीस यंत्रणेनेही हा प्रकार पाहून तर ठिकाणाचा उल्लेख करण्यावर भर दिला नसावा ना? आणि हो, सोशल मीडियावर कुठूनही फोटो टाकता येतो. हे आजच्या कोणत्याही मीडिया साक्षर व्यक्तीला कळणार नाही, असे अजिबात नाही. त्या व्यक्तीचा शोध घेणे, हे  काम फक्त सायबर विभागच करु शकतो, हे सुद्धा सर्वांनाच माहीत आहे. तरीही तथाकथित मीडियाची ही ब्रेकिंग घाई  वाचकांना अंतर्मुख होत, विचार करायला लावणारी आहे. एवढे मात्र नक्की ..

ठिकाणाच्या उल्लेखावर भर का?

सद्यकाळात नेटवर्क मधून सायबर गुन्हे होत असल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत. त्यात लिंक क्लीक करणे, पासवर्ड देणे आदि बाबींतून ही प्रकरणे घडतात. त्यामध्ये ठिकाण कोणते? ही बाब गुन्हा नोंदवित असतांना विचारात घेतली जाते का? मात्र आजचा पेपरफुटीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर त्याचे नेमके ठिकाण कोणालाही माहीत होऊ शकत नाही, असा प्रकार असतांनाही पोलिसांनी तक्रारीत ठिकाण उल्लेख करण्यासाठी आग्रह करीत एक प्रकारे दाब टाकणे. हे कितपत योग्य आणि पोलिसांनी हे कशासाठी केले ? अश्या शंका कुशंका यातून निर्माण होत आहेत. 

हा पेपर पुन्हा होणार नाही - बोर्डाचे प्रकटन

पेपर फुटीच्या व्हायरल बातमीत सकाळी १०.३० वा. पेपर फुटल्याचे म्हटले आहे. त्यावेळी सर्वच परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी दालनात दाखल झालेले होते. कारण १०.३० नंतर कोणत्याही परिक्षार्थीला दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सर्व परीक्षार्थी १०.३० ते २.३० वा. पर्यंतच्या वेळेत परीक्षा दालनातच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच कोणत्याही परीक्षार्थी पर्यंत  फुटलेला पेपर पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे गणित ह्या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असे प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने सचिव अनुराधा ओक ह्यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा