"इगो" म्हणजेच "गं ची बाधा .." ती लयच वाईट! ती कुठलंच ठेवत नाही.




 "इगो" म्हणजेच 

"गं ची बाधा .." 

ती लयच वाईट!

ती कुठलंच ठेवत नाही.


सिंदखेडराजा:- आपण सर्वजण ज्याला इगो म्हणतो, पूर्वी त्यालाच 'गं ची बाधा' असे म्हणायचे. जगण्याच्या व अनुभवाच्या दृष्टिकोनातून माझ्यासारखे अनेकजण अगदीच खालच्या पातळीतील सापडतील.

सकाळच्या न्याहरीत खायला रातची भाकर, ठेचा, खार (लोणचे) कधीमधी कुटके, दुपारी ज्वारीची भाकर व जी उपलब्ध असेल ती भाजी. रात्रीच्या वेळी मात्र हमखास डाळ ठरलेली. सोबतच नेसायला काय तर कुटुंबातील वयपरत्वे मोठ्या व्यक्तीने नेसून टाकलेले, वापरुन जुने केलेले कपडे. आणि ते जरी आणखी जीर्ण झाले किंवा फाटले तर त्याला टीपा देऊन, किंवा घरच्या सुईदोऱ्याने शिवून वापरायचे. त्यानंतर कपडे नेसायची पुढची पातळी येत नाही, तोपर्यंत शाळेतल्या सोबतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रेमाने "लाईट लाईट" म्हणून संबोधावे, असा तो काळ ..

पण, त्यावेळच्या गावगाड्यात नाकाडोळ्याची कुटुंबे सुध्दा ह्याच प्रकारचे जीवन जगत असत, त्यामुळे कुठेच उचनीचता आढळत नव्हती. त्याकाळी सुबत्ता नसली तरी प्रेम, आपुलकी, सौहार्दाने गावगाडे चालायचे. 

मात्र त्यानंतर हळूहळू धडकला तो स्वतःची व इतरांची लायकी काढण्याचा, आपसातील उचनीचतेवरुन, जातीपातीवरुन संबोधायचा, काहीही करुन आपणच कसे श्रेष्ठ आहोत, हे दाखविण्याचा काळ ..

परंतु, गावगाड्यातील मंडळी मात्र ह्याला हलक्यात घेत असत.

मात्र जसजसा काळ पुढे गेला तसतसा अनेकांतील इगो वाढायला लागला. त्याला "गं ची बाधा झाली" असे संबोधले जाऊ लागले. आता तो "इगो" झालाय.

समाजातील सर्वसामान्य, प्रामाणिक व्यक्ती मात्र आपापल्या संसारात, देवाणघेवणीच्या व्यवहारात व्यस्त असल्याने, नव्हेतर सुखासमाधानाने जगण्याची दुर्दम्य इच्छा असल्याने, अजूनही इगोच्या दुनियेत आलीच नाहीत. काही मंडळी ह्या बाबीत  आली असली, किंवा गोवली गेली असली तरी त्या सर्वांचे इगो मात्र छोटेखानीच राहिले. 

पण, समाजातील काही मोजके स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून, लावालावी करीत, कुटुंबाकुटुंबात, भाऊबंदकीत, सोयऱ्याधायऱ्यात, पंथापंथात, जातीपातीत, धर्मधर्मात भांडणे लावीत, पोळ्या शेकत आहेत.

त्यातून स्वतःचा मोठेपणा सिद्ध झाला की, ज्याला जे हवे असेल ते पदरात पाडून घेत आहेत. आपण मात्र ठरलेल्या स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडतोच आहोत.

ह्या झगड्यापेक्षा प्रामाणिकपणे, मिळाले त्यात समाधान मानत, प्रेमाने जगणे शिकू या का ..? हात जोडून एवढेच आर्जव ..!🙏

टिप्पण्या

  1. सर अगदी मार्मिक शब्दांत आपण आजच्या वास्तविकतेचं वर्णन केलंय... प्रत्येक जण मीच किती श्रेष्ठ हेच सांगण्याचा प्रयत्न नेहमी करत आहेत, परंतु यामध्ये माणूस माणसासोबत माणुसकीने वागण्याचं विसारतोय हे मात्र नक्की...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा