सिंदखेडराजा तालुक्यात सिंचन साहित्य वाटपात भ्रष्टाचार ..! करोडोंचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता ..?? संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी
सिंदखेडराजा तालुक्यात सिंचन साहित्य वाटपात भ्रष्टाचार ..!
करोडोंचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता ..??
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी
सिंदखेडराजा:- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची गंगा असणाऱ्या कृषी विभागात महाडीबीटी व पोकरा ह्या योजनेच्या अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाटपात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा त्या खात्याच्या कर्मचारी, अधिकारी व संबंधित पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत जोर धरत आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी विभाग अंतर्गत सुरु झालेल्या मोका तपासणीची नोंदणी तसेच तुषार व ठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांना वाटप केलेले साहित्य ह्यातील तफावत ही ह्यामागाची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोकरा व महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्या गावांचा समावेश झालेला आहे तेथील शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. ह्या प्रस्तावानंतर संबंधित खात्यातील कर्मचारी व अधिकारी ह्यांनी मान्यता दिली होती. अनुदान मंजूर होण्यासाठी पदानुसार सर्व्हेक्षण करुन आपल्या जबाबदारी नुसार शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेले साहित्य देणे आवश्यक असते. मात्र असे होण्यापूर्वीच शेतकऱ्यांशी संबंध साधित साहित्य न देताच आर्थिक लाभ देण्याची तसेच साहित्य घ्यावयाचे असल्यास असल्यास त्यातही साहित्य कमी करत टक्केवारी ठरविण्यात आल्याची कागदोपत्री नोंद घ्यावी असे ठरले. ह्याचाच गैरफायदा घेऊन सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे दर्शवत योजना राबविण्यात आली. मात्र हे होत असतांना आपल्या तालुक्यात डीलर किती व त्यांच्याकडून किती साहित्य उपलब्ध होईल? ह्याचा ताळमेळ जमविण्यात आला नाही. त्यातून ज्यांना योजनेचा फायदा दिला अशा शेतकऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली व त्या शेतकऱ्यांनी जेथून साहित्य खरेदी केले असे दाखविण्यात आले त्या डीलरकडे तेवढे साहित्य उपलब्ध झालेच नसल्याचे उघडकीस आले.
ह्यातून मग विभागातील वरिष्ठांच्या नजरेत ही बाब आली.
त्यानंतर खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
त्यामध्ये तालुक्यातील दोन डीलरचेच ठिबक एवढे कसे वितरीत झाले? ह्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यातून ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या नळ्या ह्या फोटो काढण्यापूरत्या वापरल्या व चिरीमिरीसाठी तेथून इतर लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आल्या. एवढेच नव्हेतर काही ठिकाणी तेथील नळ्याही काढून उर्वरित शेतकाऱ्यांना वितरीत करण्यात आल्याची घटना घडल्याचे, वरिष्ठांच्या लक्षात आले. याचदरम्यान जिल्हा पातळीवर असलेले अधिकारी यांच्याकडे ह्या बाबीची चौकशी करण्यात यावी, ह्या संदर्भात पत्रही आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र ते अधिकारी सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांनीही माझ्या जाण्यापूर्वी ह्या घोटाळ्यातील लाभ मला मिळावा, हा दृष्टिकोन ठेऊन, ह्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला बगल दिल्याची चर्चा विभागातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
तर ह्या बाबीचा उहापोह होऊन कारवाई होऊ नये म्हणून, एका माजी आमदाराला पुढे करीत, तथाकथित भ्रष्टाचारी हे सुटका करुन घेणार असल्याचेही विभागात बोलले जात आहे.
ह्या सर्व बाबींमुळे केवळ तालुक्याच नव्हेतर जिल्हा पातळीवर यंत्रणा सारवासारव करण्याच्या मार्गाला लागली असल्याचे नाव उघड न करण्याच्या अटीवर काही अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत.
●ठळक मुद्दे●
★ तालुक्यातील शेतकऱ्यांना तुषार व ठिबक वितरित केलेल्या डीलरकडील डायऱ्या ह्या विभागातील वरिष्ठांनी जप्त केल्या असल्याचे कृषी विभागात बोलले जात आहे.
★ नवल म्हणजे एका कृषी पर्यवेक्षकाच्या पतीने इतर व्यक्तीच्या नावाने डीलरशीप घेऊन ह्यामध्ये मलाई ओरपली असल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे.
★ राज्यातील सरकार नुकतेच बदलले असल्याने, प्रकरण निस्तारण्यासाठी वेट अँड वाच अशी भूमिका ठेवण्याचे राजकीय सूत्रांनी वर्तवल्याची चर्चाही संबंधित विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये आहे.
★ पूर्व संमती व डीलर कडून शेतकऱ्यांना साहित्य वाटप ह्यामध्ये अनियमितता झाली असल्याची माहिती, तालुका कृषी अधिकारी, वसंतराव राठोड ह्यांनी दिली असून, ह्यासंदर्भात आपली चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
★ आपण नुकताच पदभार स्वीकारला असून माझ्या अगोदर पदावर असलेले नाईक ह्यांनी ह्या भ्रष्टाचारासंदर्भात निवृत्त होण्यापूर्वीच चौकशी लावली आहे असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी संतोष डाबरे ह्यांनी दिव्यमराठीशी बोलतांना सांगितले.
★ तालुका कृषी अधिकारी यांच्यासह ३ सुपरवायझर, १ मंडळ अधिकारी, व १ कार्यालयीन कर्मचारी ह्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती हाती आली आहे.
★ शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याची भूमिका ठेवणाऱ्या ह्या भ्रष्टाचारासंबंधी खात्रीशीर वृत्त आपल्या कानावर आले आहे. ह्या संबंधी वरिष्ठांनी कारवाई सुरु केल्याचेही समजले आहे. त्याचे स्वागतच असून, दोषींवर कठोर कारवाई करा अन्यथा उग्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे ह्यांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏