अपात्रतेचा निकाल तर लागला .. आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ?
अपात्रतेचा निकाल तर लागला ..
आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ?
सिंदखेडराजा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी पक्षीय व्हीप नाकारला म्हणून त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या ह्या आरोपानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश मे २०२३ नंतर देण्यात आले.
ह्या प्रकरणाच्या सुनवाईत मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीन बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यामध्ये तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ तसेच बहुमत सिध्द करण्यासाठी दिलेले निर्देश चुकीचे असल्याचे म्हटले होते. तिसरी बाब म्हणजे जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांनाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही स्पष्ट केले होते.
जसे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले त्यानंतर निकाल उशीरा देण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी वेळकाढूपणा अवलंबवण्यात आल्याचे प्रकारही घडले. त्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती.
विधानसभा अध्यक्षांनी शेवटी १२०० पाने वाचल्यानंतर एकदाचा निकाल लागला.
निकाल लागल्यानंतर न्याय कुणाला मिळाला व अन्याय कुणावर झाला? ही बाब राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य जनतेच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामध्ये बहुतांश राजकारण्यांनी निर्णय आपल्या राजकीय सोयीनुसार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिक मात्र व्यक्त न होता, आपल्या सदसद्विवेकबुद्धी नुसार निवडणुकीत कोणते बटन दाबायचे ह्या निर्णयापर्यंत पोहोचला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे सगळं प्रकरण घडत असतांनाच, युती व आघाडीतील घटक पक्षात अचानक बदल झाले. त्यामुळे राज्यभर राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षात तर कोण व्यक्ती कोणत्या गटाची हे ऐनवेळी कळेनासे झालेले आहे, त्यासाठी मेंदूवर जोर देऊन संदर्भ लक्षात घ्यावे लागतात.
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. ज्या दोन राजकीय पक्षांची दोन शकले झालेली आहेत, आजीमाजी आमदार त्याच पक्षांचे आहेत. ते आपापल्या परीने हालचाली करीत असतांना इतरही पक्षांचे व अपक्ष इच्छुकही कामाला लागले आहेत. त्यामुळे सत्तेची समीकरणे काय राहतील? ह्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न ...
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचा राजकीय परीक्षेप लक्षात घेता, ह्या मातीतील राजकीय वाटचाल गांधींचे विचार घेऊन काँग्रेस व जनपद पासून सुरु झाली आहे. आजकाल राजकारणात उपटसुंभासारखे जे भडक विचार अचानक दाखल होऊन मस्तक चक्रावतात. तसले चित्र त्यावेळी नव्हते. दिलेल्या शब्दासाठी जो प्रामाणिक राहू शकतो, सर्वसामान्य जनता त्याच्या पाठीशी उभी राहायची. त्यानंतर सहकार क्षेत्राशी निगडित चळवळीने राजकीय क्षेत्र काबीज केले. त्यापुढे जातीय समीकरणे उभी राहिली. त्याचा परिणाम अजूनही दिसत असला तरी, युवक वर्ग प्रचंड जागरुक झाल्याचेही विविध अनुभवातून दिसून येते. फक्त सत्तेसाठी पंधरा लाख देतो, ह्या बोगस उक्तीप्रमाणे मतदारसंघाचा विकास करतो म्हणत, एवढे आणले तेवढे आणले म्हणणाऱ्या बांडगुळांची पैदास ह्या मातीत आताशा दिसत व उमटून पडत आहे.
हे बेगडी चित्र सोडत, मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात उमेदवारीचा विचार केला तर राज्यात जी महायुती म्हणजे शिवसेना (शिंदे गट) + भाजप + राष्ट्रवादी (अजित गट) हे सध्या सत्तेत आहेत, त्यांचे समर्थक डॉ. राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार आहेत. तर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर जे डॉ. शिंगणे ह्यांचे विरोधक समजले जातात, नव्हेतर अजूनही ठासून विरोध करतात. ते शिंदे गटाचे समर्थक असल्याने, उमेदवारी बाबत त्यांचीही गोची झालेली आहे. हे चित्र असतांनाच खेडेकर यांनी उबाठा गटाकडून उमेदवारी घ्यावी, ही बाब त्यांचे समर्थक बोलून दाखवत असल्याचे आढळून येते. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव ह्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत आ. डॉ. शिंगणे ह्यांनी मोठ्ठे आव्हान दिले होते. सद्यस्थितीत मात्र दोघेही एकाच गटात असल्याने खासदार जाधव हे डॉ. खेडेकर ह्यांना कसा काय पाठिंबा देऊ शकतील? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेच्या समीकरणात महायुती असल्याने भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांचीही गोची झालेली आहे. तरीही ओबीसीच्या नावावर पंकजाताई यांचे नाव घ्यायचे, नव्हेतर कट्टर निष्ठावान असलेले दर्शवायचे. अन सत्ता व उमेदवारी ह्यासाठी आपण मात्र नुकतेच फडणवीस ह्यांच्याशी अंडरग्राउंड जुळवून घेतल्याचे "निदान" राजकीय रुग्णांना सांगणारे महाभागही राजकीय पटलावर आहेत.
राज्यात विरोधी पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) + काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार गट) ह्यांच्याकडून उमेदवारी बाबत समीकरण निश्चित माहीत नसले तरीही, इतिहास बघता ह्या मतदारसंघात उमेदवारीमध्ये उबाठा गटाचा प्रथम दावा ठरु शकतो. परंतु, ज्यांना दिगग्ज म्हटल्या जाते, ते शिंदे गटाशी संधान साधून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारी संदर्भात भाकीत करता येणे शक्य नाही. तरीही मतदारसंघात एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळख व चांगला जनसंपर्क असलेल्या सामान्य व्यक्तीलाही जरी उमेदवारी दिली तरीही ते एक तगडे आव्हान ठरु शकते.
मागच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची सुद्धा उमेदवारी होती. मात्र त्यांचे उबाठा गटाशी संधान साधणे सुरु असल्याने चित्र अधांतरी आहे.
त्यातच ज्यांचा विधानसभा मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे त्यांची क्रमवारी पुढीलप्रमाणे आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे, सविताताई मुंढे, तोताराम कायंदे, विनोदभाऊ वाघ, डॉ. शशिकांत खेडेकर, मनोज कायंदे इत्यादि.
मतदारसंघात काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, संघटना व चळवळी आदिंचा सुद्धा चांगला पगडा दिसून येतो. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकीय आखाड्यात उडी घेत शड्डू ठोकले नसले तरीही सध्याच्या राजकीय गोंधळाची बजबजपुरी उतली असतांना, त्यांचाही ऐनवेळी राजकीय चंचुप्रवेश नाकारता येत नाही.
एकंदरीत मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राज्यातील अस्थिर राजकीय वातावरणाशी मिळतीजुळती परिस्थिती असली तरीही, ह्या मातीतील राजकीय वैचारिक भूमिका, सहकार चळवळ, वैयक्तिक निष्ठा, सच्चाई कळणारे युवक सोबतच विविध चळवळी ह्या सगळ्या बाबीतून सर्वसामान्य जनतेची सहानुभूती नेमकी कुणाच्या पाठिशी उभी राहते? हे सध्या सांगता येणार नसले तरी घोडा मैदानातील व वेळेवर निर्माण होणारी परिस्थिती येत्या काळात ठरणार आहे, एवढे मात्र खरे ..!

टिप्पण्या
तसं पाहिलं तर डॉ.शिंगणेना राजकीय पर्याय कोण होऊ शकेल ? या प्रश्नाचे उत्तर हे तोताराम कायंदे व डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याजवळ जाऊनच थांबते !! परंतु वरील प्रमाणे राजकीय खिचडी झालेल्या समीकरणात कदाचित !! जर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला तर मनोज कायंदे किंवा सविताताई मुंढे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
खासदार प्रतापराव जाधव आपल्या राजकीय लाभासाठी डॉ.शिंगणेंशी कधीही जमवून घेऊ शकतात व डॉ.खेडेकरांना उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर काढू शकतात !! परंतु दिसना दादा हे जर तर आहे !! निवडणूक लागेपर्यंत अजूनही वादळी घडामोडी घडण्याची शक्यता आहे !!
निष्क्रिय आमदार याना स्वतःच काम करण्या ची इच्छा नाही,आणि डॉ.खेडेकर म्हणजे टक्केवारी पुरुष आहेत हे सर्व जनतेला कळून चुकले आहे..सत्ते साठी बाप बदलणारे हे लोकं आहेत यांच्या कडून काय अपेक्षा करणार विकासाची.
शिंगणे रडून आमदार झाले मागच्या वेळेस आता सिंदखेडराजा ल नवा चेहरा पाहिजे ,युवांना रोजगार संधी नाही.संभाजीनगर, पुणे,मुंबई इकडे युवक कमा साठी स्तलांतरित होत आहेत.यांना फक्त सत्ता हवी.याला संपूर्ण मतदार संघाचे जनता जबाबदार आहे. आता वेळच बदलाची आहे ,फक्त सावडण, लग्न, ल येणारा नेता नको तर कामे करणारा माणूस पाहिजे.
उडत गेला नेता, आता एकच काम दाबा नोटा.
दुसऱ्याचा बाप पळवण्याचा प्रकार जनतेला किती मान्य हे काळच ठरवेल
कुणी कुणाची लावणार, काय गणितं असणारं गावातील गट, पंच्यात, तरुण, महिला बचत गट, तसेच कुणी कोन पडला नी कोन आणला हे पण हातभार लावण्यासाठी तयार आहे.
फक्त अजून सोप्या भाषेत हवे होते..
परीक्षेप वगैरे हे ग्रामीण भागात कळत नाही.
या मतदार संघात विकास निधीच्या गप्पा जेवढे माजी आमदार हाणतात, हे जे तुम्ही नाव न घेता मांडले.. तसा या मतदारसंघातील सुदृढ असलेला सहकार कसा हातबल झाला आहे ? याचीही राजकीय कारणे द्यायला हवी होती !
- राजेंद्र काळे