भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल
भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला
बहिणीची भावाला यकृत भेट
स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल
सिंदखेडराजा:- भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला एका बहिणीने आपल्या भावाला यकृतदान करीत समाजात एक स्पृहणीय आदर्श निर्माण केला आहे.
दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा दिवस भावाबहिणीच्या नात्यातील महत्वाचा दिवस असतो. त्यानिमित्ताने भावाच्या घरी म्हणजेच माहेरी हक्काधिकाराने जाता येत असते. भाचे मंडळी सुद्धा मामाच्या घरी जाण्यासाठी आतुर असतात.
त्यामुळेच दिवाळीचा सण आला की सासुरवाशीण महिला माहेराकडे डोळे लावून आठवण काढत असतात.
तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सौ. दुर्गा अरुण धायतडक हिचे माहेर देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा हे आहे. तिचा भाऊ हॉटेल व्यावसायिक रमेश नागरे यांची प्रकृती काही दिवसांपासून अधूनमधून खराब होत होती. त्यामुळे लहान भाऊ संतोष नागरे व कुटुंबीयांनी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात निदान व उपचारासाठी नेले. त्यात यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. परंतु त्यामध्ये यकृत बिघाड जास्तच असल्याचे आढळले. त्यामुळे औषधोपचाराने आजार नियंत्रण साध्य होणार नाही. मात्र यकृत अवरोपण केल्यास पूर्णपणे आराम मिळेल असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. आता कुटुंब, नातेवाईक, मित्र, हितचिंतक सगळेच यकृत कोण देईल? ह्या बाबीने चिंताग्रस्त झाले. ही बाब रमेश नागरे यांची बहीण दुर्गा अरुण धायतडक यांच्या कानावर पडल्याने ती सुद्धा बहिण व्यथित व चिंताग्रस्त झाली. भाऊ जर जिवंत असला तरच मी भावासोबत दिवाळी भाऊबीज व रक्षाबंधन आदि सण साजरे करण्यासाठी भावाच्या घरी जाऊ शकेल. त्यामुळे भावाला जर आपणच यकृत दिले तर मात्र भाऊ वाचू शकतो, असा विचार तिच्या मनात पक्का झाला. तिने आपल्या मनातील ही कल्पना पतीला सांगितली. अरुण धायतडक यांनी क्षणाचाही विचार न करता, लगेच होकार दिला. धायतडक कुटुंबीयांनी लगेच मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल गाठले. तेथे सर्व तपासण्या झाल्या. त्यात भावाच्या प्रकृतीशी यकृत मॅच झाले. विनाविलंब तज्ञ डॉक्टरांनी ऑपरेशन करून दुर्गाचे यकृत भाऊ रमेश यांना प्रत्यारोपित केल्या गेले. सध्या दोघांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऐन दिवाळी सणात त्यातही भाऊबीजेच्या पूर्वसंध्येलाच बहिणीने भावाला स्वतःचे यकृत देऊन भावाचा जीव वाचवल्याचा अनोखा दाखला समाजासमोर आला आहे.
भावनाप्रधान करणाऱ्या ह्या स्पृहणीय प्रसंगाची पोस्ट समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे. यातून सगळीकडे अभिनंदनीय व स्वागतयुक्त वातावरण व चर्चा आहे.

टिप्पण्या