महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय पुन्हा मातृतीर्थात ..

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय पुन्हा मातृतीर्थात ..


           दीसना ✍️

सिंदखेडराजा:- मतदारसंघातील पाणी समस्या निर्मूलनासाठी देऊळगावराजा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्या कार्यालयाची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर ते कार्यालय तेथून स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून म. जी. प्रा. चे तेच कार्यालय  देऊळगावराजा येथे स्थलांतरित करण्यात पुन्हा यश आले आहे. त्यामुळे देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर व चिखली आदि तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बळ प्राप्त झाले आहे.

सिंदखेडराजा व देऊळगावराजा ह्या दोन शहरात २५ वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई होती. नव्हेतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही शहरातील तोच मुद्दा खूप गाजला होता. त्यावेळी छत्री ह्या निशाणीवर अपक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे व त्यांच्या समर्थकांनी ह्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करुन निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत डॉ. शिंगणे हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी भाजप व सेना युतीतील शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते. त्यानंतर त्यांनी राज्यातील पाणी समस्या सोडविण्याकडे विशेष लक्ष पुरविले व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी तातडीने कार्यरत झालेल्या कार्यालयातून मराठवाड्यातील धारकल्याण, पीरकल्याण धरणातून पाणी आणून सिंदखेडराजा व देऊळगावराजा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. त्याचदरम्यान देऊळगावराजा येथे पंचायत समिती समोर म. जी. प्रा. कार्यालयाची उभारणी करण्यात आली.

अगदी कमी काळात सिंदखेडराजा येथील माळ सावरगाव व देऊळगावराजा येथील जाफ्राबाद मार्गावरील तहसीलदार निवास स्थानासमोर पाणी शुद्धीकरण यंत्रणा सुरु होऊन दोन्ही शहराला पाणी पुरवठा सुरु झाला. हे सर्व होत असतांनाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे देऊळगावराजा येथील कार्यालय चिखली येथे स्थलांतरित झाले. 

नुकतेच ह्या बाबीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष वेधले गेले व पाणी प्रश्नासारख्या गंभीर बाबीचे कार्यालय देऊळगावराजा शहरात यावे ह्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. अर्पित मिनासे यांच्यासह संपूर्ण चमूने ह्या बाबीचे महत्व लक्षात घेऊन दि. ४ जून रोजी आमदार तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांना निवेदन दिले. डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांनीही ह्यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन चिखली येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आता देऊळगावराजा येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याचे पत्रही प्राप्त झाले आहे.

स्वमालकीच्या जागेत कार्यालय आल्यामुळे सिंदखेडराजा व देऊळगावराजासह चिखली, मेहकर व लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडविण्याचे काम उमेदीने सुरु होईल असा आशावाद मतदारसंघातील जनतेत निर्माण झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!