धार्मिक विद्वेषाची बीजे राजकीय लाभासाठीच – सत्यपाल महाराज
धार्मिक विद्वेषाची बीजे राजकीय लाभासाठीच – सत्यपाल महाराज
महिलांनी स्वतःला डोळस बनवल्यास समाजातील अंधश्रद्धा अक्षरश: कोसो दूर जाईल
सिंदखेडराजा:- स्वतःचे व कुटुंबाचे भले होईल ह्या आशेतून महिला श्रद्धेतून अंधश्रद्धा व बुवाबाजीच्या फासांत अडकतात व त्याचे वाईट परिणाम समाजात दिसून येतात. त्याचेच उघड उदाहरण नाशिकच्या खरात प्रकरणात उमटून पडले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सक्षम मेंदूला विचारावीत. त्यासाठी वैचारिक बाजू कणखर ठेवावी लागते व ती शिक्षण तसेच वाचनातून येत असल्याचे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
तालुक्यातील साखरखेर्डा येथील महाकालेश्वर मंदिर परिसरात ७ एप्रिल मंगळवारी आयोजित महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधनपर कीर्तनात सत्यपाल महाराज बोलत होते.
आपल्या किर्तनात त्यांनी महिलांनी ढोंगी बाबा आणि बुवाबाजीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. नव्हेतर मुलं होण्यासाठी, वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्याही बाबाकडे जाणे ही चुकीची मानसिकता असल्याचे ठासून सांगितले. भोंदूबाबा व त्यापोटी आलेल्या अंधश्रद्धेमुळे समाजाची दिशाभूल होणे अजूनही सुरुच असल्याचे नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी अशा ढोंगी प्रवृत्तींचा तीव्र निषेध व्यक्त केला.
किर्तनात पुढे महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाबाई यांनी समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी केवढा मोठा त्याग केला याची उदाहरणे विषद केली. याचवेळी संत परंपरेचे विश्लेषण करीत संत तुकाराम, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आणि संत सावता माळी यांनी त्यावेळच्या अवघड काळात समाज प्रबोधनाचे परखड कार्य केल्याचेही नमूद केले.
एका दिवसाचा मोठेपणा दाखवण्यासाठी लग्न आदि कार्यात होणारा अनाठायी खर्च टाळत, सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच चांगल्या संस्कारांची शिदोरी ठरणारी कुटुंबमूल्ये जपण्याचे आवाहन केले. तर केवळ मतांसाठीच्या राजकीय लाभासाठी देशात जात, पंथ, संप्रदाय व धर्माच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, सर्व धर्मियांनी एकत्र राहून परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी, यातच देशाची प्रगती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले मंडळ व सावता ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते. संचलन ग्रामविकास अधिकारी वशिष्ट खरात यांनी तर सत्यपाल महाराज यांचे प्रथम स्वागत दिलीप बेंडमाळी , संतोष मंडळकर यांनी केले.
ह्या किर्तनासाठी परिसरातील अफाट जनसमुदाय लोटला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏