खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप; सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी

 खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत निधी अपहाराचा गंभीर आरोप; 

सरपंच-सचिवांवर चौकशीची मागणी




सिंदखेडराजा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, सरपंच व सचिवांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरुड आणि सचिव पी. जी. जाधव यांनी पूर्वीचे ग्रामसेवक जी. आर. गवई यांच्या संगनमताने विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, सदस्यांना विश्वासात न घेता व ग्रामसभेची मंजुरी न घेता थेट कामे दाखवून खोटे बिल सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीसह इतर खात्यांमधील रक्कम काढून घेतल्याचे, तसेच प्रत्यक्षात काम न करता बिल पास करून निधीचा अपहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, अधिकृत अधिकार नसताना डीएससी (डिजिटल सिग्नेचर) चा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, माहिती अधिकाराखाली मागवलेली माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देत "ऑनलाइन माहिती घ्या" असे सांगून जबाबदारी टाळली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शाळा दुरुस्ती, गटार बांधकाम, जलजीवन मिशन योजनेतील कामे यामध्येही मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे निवेदनात नमूद आहे. गावकऱ्यांनी वर्गणी काढून केलेल्या कामांवरही खोटे बिल सादर करून निधी काढल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी कोणतेही काम न करता थेट बिल काढण्यात आल्याने शासकीय निधीची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे, जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत असून, पाइपलाइन व नळ जोडणीचे काम रखडलेले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अद्याप पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे.
या सर्व प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन नेमकी कोणती भूमिका घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर अलका सुधाकर नागरे, नंदा श्रीकृष्ण तळेकर, विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, जनार्दन विक्रम नागरे, दत्तू त्र्यंबक तळेकर आदि ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!