काळीज कोंडीतून अनेक सामाजिक कोंडींची मुक्ती होवो .. प्रवीण, लेखन क्षेत्रात तुझा ठसा उमटणार ..
काळीज कोंडीतून
अनेक सामाजिक कोंडींची मुक्ती होवो ..
प्रवीण,
लेखन क्षेत्रात तुझा ठसा उमटणार ..
दीसना✍️
असं म्हणतात की, एक परिच्छेद लिहिण्यासाठी भरपूर अनुभव, अनेक पुस्तकं वाचलेली असावी लागतात. त्यातल्या त्यात लिहिणे हा प्रांत पूर्वी तथाकथित नोंद असलेल्या बुद्धिवाद्यांचा होता. मात्र आपल्या मातीतील अनेकांच्या वाचनाच्या तसेच अनुभवांच्या कक्षा विस्तीर्ण असल्या तरी लेखन प्रांताकडे त्यांचे दुर्लक्षच असल्याचे आढळून येते. विविध मुद्द्यांवर समाज प्रबोधन करण्यासाठी भोवताली अनेक विषय असतांनाही आम्ही त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. सध्या समाजमाध्यमातून शेंडा बुडूख नसलेल्या कुठलाही संदर्भ नसलेल्या गोष्टी माथी मारल्या जात आहेत. सध्याची शिक्षित असलेली युवापिढी वेगळ्या दिशेला नेत, तथाकथित ज्ञान परंतु वास्तवात घोर अज्ञानाच्या गर्तेकडे नेल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र ढळढळीत समोर उभे असल्याची परिस्थिती आहे. याचवेळी माझा भाऊ प्रवीण गीते समाज प्रबोधनाचे शिवधनुष्य उचलतो नव्हेतर लीलया पेलतोय, असा आशेचा किरण त्याच्या आतापर्यंतच्या लेखातून ठसठशीतपणे उमटून आलाय.
प्रवीणचे वाचन व व्यासंग दांडगे असल्याचे त्याला ओळ्खणाऱ्यांना चांगलेच माहीत आहे. त्यातल्या त्यात विविध मनोवृत्ती, कलंदर व्यक्तिमत्त्व आदिंचाही त्याचा दांडगा अभ्यास आहे.
ह्या सर्व अनुभवातूनच त्याचे लेखन प्रभावी व दमदार होत आहे.
मिळेल तसे वृत्तपत्रीय लिहिण्याचा 'दीसना' नावाने माझा ब्लॉग आहे. त्यातून वृत्त असो की, एखादी घटना, प्रसंग त्यावर माझी मते मी परखडपणे मांडत असतो. त्यातुन माझ्याबद्दलची अनेकांची मते मी अनुभवत असतो.
मात्र सामाजिक, वैचारिक क्षेत्रात थोडीफार मतभिन्नता जरी असली तरी माझ्या लिहिण्यामागची प्रवीणची स्पष्ट भूमिका तो कधी सकारात्मक तर कधी विरोधात त्याच्या खेळकर स्वभावाने तो मांडत असतो.
कोणत्याही बाबीकडे, प्रश्नाकडे (मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसलो तरी काहीजण माझ्यावर शिक्का मारतात, त्या राजकीय बाबीचा येथे दुरान्वयानेही अजिबात संबंध नाही) बघण्याचा दृष्टिकोन यातून थोडीफार वैचारिक मतभिन्नता असली तरी सामाजिक स्तरावर आमची मैत्री अबाधित आहे.
खुल्या दिलाने बोलणाऱ्या बोटाच्या कांड्यावर मोजता येतील अशा मोजक्या व्यक्तींपैकी प्रवीण एक आहे.
सानप गुरुजींचा वैष्णवगड, अण्णासाहेब देशमुख यांचा प्रभावी वाचन व्यासंग व शांताबाई काळे यांची उपेक्षा आदि लेखातून लेखनप्रपंच नुकताच कुठे सुरु झाला असला तरी त्याच्या लेखातील मर्म हृदयाचा ठाव घेणारे व खूपच खुमासदार असते. त्यातील डोळसपणा तर वाखाणण्याजोगा असतो. नव्या पिढीतील युवकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिलेला दिसून येतो. त्यामुळेच शिक्षित असूनही अज्ञानाच्या गर्तेत लोटणाऱ्या अज्ञानाच्या महाभयंकर काळोखातून ह्या युवापिढीची नक्कीच सुटका होईल. लेखन काळीज कोंडी असले तरीही अनेक बाबींची कोंडी ह्यामुळे मोकळी होत आहे, एवढे मात्र निश्चित ..!
प्रवीण,
तुझ्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा ....!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏