राऊत साहेब, कृपा करुन, लोड शेडिंग सुरु करा हो ..! साखरखेर्डा परिसरातील जनतेची मागणी ..
राऊत साहेब,
कृपा करुन,
लोड शेडिंग सुरु करा हो ..!
साखरखेर्डा परिसरातील जनतेची मागणी ..
सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील गंभीर परिस्थिती आज जाणवली. जनतेच्या मनातील भावना जाणत वैतागून गेलेल्या काहींच्या लोड शेडिंग सुरु करण्याची भावना पुढे लिहीत आहे. ह्याचा वास्तवाशी किती संबंध आहे? हे त्रास भोगणाऱ्याला विचारले तर निश्चितच कळेल.
आज दि. १४ मे, शनिवारी सकाळीच पेपर वाचला (ज्याचे छायाचित्र वर दिले आहे) मन अगदीच पुलकित झाले. आधी हुश्श .. केलं, आणि नंतर राऊत साहेबांना मनोमन धन्यवाद दिले. त्याचवेळी लाईट गेली, म्हटलं येईल थोड्या वेळात .. पण, कशाचं काय तास, दोन तास, नव्हेतर तीन तास उलटले लाईट आलीच नाही. मग विचार केला की फॉल्ट असेल परंतु, मेहकर ते साखरखेर्डा ह्या मुख्य वहिनीच्या दुतर्फा असलेली अडगळ, झाडे, झुडुपे काढण्यासाठी म्हणा की देयके काढणाऱ्या ठेकेदार साहेबांच्या सोयीसाठी म्हणा वीज प्रवाह बंद केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी बहुतेक चौकशी येणार असल्याचे वृत्त असल्याने ह्याचवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही अनौपचारिक बोलतांना गंमतीत सांगण्यात आले.
आज सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत मेहकर येथून साखरखेर्डा कडे येणारा वीज पुरवठा खंडित राहील असे कंपनीच्या विभागातील माहिती होती. परंतु पावणे बारा वाजले तरीही वीज पुरवठा खंडितच असल्याचे चित्र आहे.
त्यातल्या त्यात तापमान वाढतच चालले असल्याने आणि ९ ते ९.३० वा. नंतर तापमान दुपारसारखे ४०℃ पर्यंत जाते. त्यामुळे वीज बिलाचे भान ठेवून आपापल्या कुवतीनुसार पंखे, कुलर तर तुरळक ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा (एसी) सुरु करुन विविध व्यावसायिक तसेच घरगुती वापर सुरु होतो.
मात्र आज ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत साहेबांची सर्वसामान्यांना दिलासा देणारी लोडशेडिंग बंद केल्याची बातमी येताच तिचे सर्वत्र स्वागत झाले.
साखरखेर्डा परिसरात मात्र वर उल्लेखलेल्या प्रमाणे वीज गेलेलीच असल्याने, उर्जामंत्र्यांच्या घोषणे बाबत शंकाकुशंका व्यक्त होत एकमेकांना कॉल तसेच समाज माध्यमांतून विचारणा करण्यात आली. त्याचवेळी कंपनीच्या स्थानिक संपर्काचा मोबाईलही व्यस्तच येत होता. कॉल केल्यावर व्यस्त आला की कॉल बॅक करणे हे साहेबी थाटाला शोभत नसावे? म्हणून कर्मचारी ती तसदी सुद्धा घेत नाहीत.
एकंदरीत लेख लिहिपर्यंत साडेतीन तास उलटून गेले असले तरीही लाईट आलेली नाही.
त्यातूनच लोडशेडिंग पुरली परंतु तासंतास अशी वीज जाणे परवडणारे नाही, म्हणून की काय? जनतेतून पुन्हा लोडशेडिंग सुरु करा अशी मागणी करण्यात येत आहे.
याचे कारण म्हणजे लोडशेडिंगमुळे खंडित झालेला वीज पुरवठा कमी अधिकपणे वेळेवर सुरु होत असतो. मात्र लोडशेडिंग नसले तर अर्धा अर्धा किंवा संपूर्ण दिवसच लाईट गायब राहू शकते, ह्या भीतीने जनतेच्या घामाघूम झालेल्या अंगावर ओलसर शहारे उभे राहत आहेत, एव्हढे मात्र निश्चित ..!
लेख लिहून संपत नाही तोच अगदी बारा वा. सुमारास वीज पुरवठा सुरु झाला आहे. मात्र तरीही जनतेच्या मनातील धाकधूक बघता राऊत साहेबांनी ह्यासंदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना करावी, असेही बोलल्या जात आहे.🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏