सिंदखेडराजा तालुक्यात वीजेचा लपंडाव साखरखेर्ड्यात कळस वीज ग्राहक वैतागले समस्या निवारणार कोण?

 


सिंदखेडराजा तालुक्यात

वीजेचा लपंडाव 

साखरखेर्ड्यात कळस

वीज ग्राहक वैतागले

समस्या निवारणार कोण?


दीसना✍️


सिंदखेडराजा:- तालुक्यात वीजेचा लपंडाव तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याने कळस गाठला असून, संबंधित यंत्रणा गेंड्याची कातडी ओढून चुप्पी साधून आहे. याबाबतीत कुणीही लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने जनतेचा भ्रमनिरास होत आहे.

तालुका व वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात चार केंद्रांच्या माध्यमातून १२० गावांचा कारभार हाकलल्या जातो. त्यासाठी उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंते व कंपनीचे तसेच खाजगी वायरमन असा भलामोठा लवाजमा कार्यरत आहे. यंत्रणेचा एवढा मोठा डोलारा असूनही, जनतेच्या सोयीसुविधेची काळजी केल्या जात नसून, मनमानी कारभारामुळे "बडा घर पोकळ वासा अन वारा जाई भसाभसा" ह्या उक्तीप्रमाणे सर्वकाही सुरु आहे. वीज पुरवठा करणाऱ्या सामुग्रीतील अनेक ठिकाणची सामुग्री ही जुनाटच असल्याचे दिसून येते. काही अपवाद वगळता वर्षोगणती सामुग्रीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यातुनच कागदोपत्री तर देखभाल दुरुस्ती केल्या जाऊन नुसती देयके तर काढली गेली नाहीत ना? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. वीज पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्यावर बहुतांश ठिकाणी तात्पुरती डागडुजी स्वरुपातील दुरुस्ती केल्या जाते. त्यानंतर पुन्हा बिघाड होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव अनेक ग्राहकांना आहे. त्यातल्या त्यात साखरखेर्डा परिसरात तर वीजेचा लपंडाव व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. तासंतास वीज गायब राहण्याची ग्राहकांना एवढी सवय झाली आहे की वीज पुरवठा बंद पडल्यावर, आता काही तासांनीच पुरवठा सुरळीत होईल अशी खूणगाठ मानसपटलावर बांधल्या गेली आहे. 

त्यातल्या त्यात ह्यापूर्वी वीज पुरवठा बंद झाल्यावर तसेच ग्राहकांच्या अडचणी असल्यावर विचारणा करणारे काही लोकप्रतिनिधी गेल्या अनेक महिन्यांपासून मूग गिळून चूप बसले आहेत.

यातून एकीकडे निगरगट्ट झालेले यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तर दुसरीकडे जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करणारे काही लोकप्रतिनिधी अशा जात्याच्या दोन पाट्यात जनता रगडली जात आहे.

तर आपल्यावर केसेस होतील म्हणूनही काही लोकप्रतिनिधी ह्या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे काहीजण सांगतात. त्यामुळे सिंदखेडराजा उपविभागातील वीज ग्राहकांना आता कुणीही वाली उरला नसल्याचे व यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षिततेच्या बुक्क्यांचा मार तोंड दाबून सहन करावे लागत असल्याचे चित्र तूर्तास तरी आहे. तसेच निदान आता वरिष्ठ अधिकारी तरी ह्या गैरसोयीकडे लक्ष देऊन, ग्राहकांच्या सुविधेसाठी कायम स्वरुपी वीज पुरवठ्याच्या मृगधारा बरसतील का? ह्या चातक प्रतिक्षेत वीज ग्राहक आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला