मातृतीर्थात त्या वेडेपणाची झाली वर्षपूर्ती , ते वेडे म्हणजेच "बळीवंश"
शेतकऱ्यांची बाजू घेणे,
हिताची, संघर्षाची भूमिका मांडणे
म्हणजेच वेडेपणा
९ ऑगस्ट रोजी 'भारत छोडो' आंदोलनदिनी
मातृतीर्थात त्या वेडेपणाची झाली वर्षपूर्ती
ते वेडे म्हणजेच "बळीवंश"
सिंदखेडराजा:- तालुक्यातील भौगोलिकता पाहता इथे विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. मागील कालावधीत नैसर्गिक अन्न साखळी तुटल्याने व त्यामुळे वन्यप्राण्यांचे असंतुलन निर्माण झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांना पिक उत्पादनात होतो आहे. ही बाब लक्षात आली ती रुम्हणा येथील एक युवक जो बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहे व मातीशी जन्मजात नाते आहे त्याचा लक्षात ही बाब आली. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना नव्याने समोर आली व दृढही झाली आहे. त्यामुळे आपल्याला काम करुनही वेळ मिळतो, त्याचा लाभ आपण कुटूंब, गाव, परिसर नव्हेतर आपल्या मातृतीर्थातल्या सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना देऊ शकतो यावर त्याचे लक्ष केंद्रित झाले नव्हेतर त्याने जाणीवपूर्वक केंद्रित केले. यासाठी चळवळ निर्माण व्हावी म्हणून ९ ऑगस्ट, २०२३ रोजी बळीवंश असे नामकरण केले. सगळ्याच सदस्यांना पूर्ण वेळ देणे शक्य नसल्यामुळे कोअर समितीची स्थापना केली. त्यामध्ये शेतीसह तंत्रज्ञान व इतर जाणकारांचा समावेश करण्यात आला.
वन्यप्राण्यांमुळे (विशेषतः नीलगाय किंवा रोही) होणारे नुकसान लक्षात घेऊन स्थापनेच्या लगोलग आलेल्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२३ रोजी "बळीवंश" चळवळीच्या माध्यमातून आत्मक्लेश आंदोलन हाती घेण्यात आले. त्यावेळी ५४ पेक्षा अधिक गावांमध्ये त्याला पाठिंबा मिळाला. त्याचा पाठपुरावा करण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना एकत्रित सुमारे १२ कोटी एवढी नुकसान भरपाई मिळाली. यातूनच राज्य शासनाकडून सोलर कुंपण योजना जाहीर केल्या गेली. नव्हेतर राज्य शासनाने नीलगाय किंवा रोही यांच्या शिकारीचाही निर्णय घेतला.
वर्षाच्या शेवटी नैसर्गिक संकटांमुळे शेतातील उत्पन्नाचे तीनतेरा वाजले व दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. हे लक्षात आल्यावर दिवाळीच्या दिवशीच एक दिवस बळीराजा साठी हे आंदोलन करण्यात आले. त्याद्वारे ९१ गावांमध्ये दिवेलागण करीत शेतकऱ्यांचा प्रतिसाद प्राप्त झाला.
सामुहिक विहीर योजनेच्या विहीरींचा प्रश्न हाती घेऊन शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला.
अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण मोफत करुन दिले गेले आहे.
आता नुकतेच पिक विमा आंदोलन तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व योजना यावरही लक्ष देण्यात येत आहे. विविध ठिकाणच्या निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एकीकडे मस्त नोकरी करायची, तेवढ्याच परिघात रमायचे असे सगळीकडे सुरु असतांना नव्हेतर त्याचे समाजातील सगळ्याच घटकांकडून कोडकौतुक होत असतांनाच, दुसरीकडे हा उपद्व्याप करणे म्हणजे "घरच्या भाकरी खाऊन मामाच्या बकऱ्या वळणे" हे समाजहिताचेज व समाजबांधणीचे काम असते. ते करणाऱ्या या वेड्या शेतकऱ्यांना व त्यांच्या पुत्रांना वर्षपूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!
लोकशाही मार्गाने वाटचाल करणाऱ्या भारतात शेतकऱ्यांचा खरा वाली म्हणजे विरोधी पक्ष होय. कारण आमची भूमिका शेतकरी हिताची आहे, असे दर्शवत जो कुठलाही पक्ष सत्तेवर आरुढ झाला, त्याने शेतकऱ्यांना धीर देणे तर सोडाच परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. (हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे)
स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे हितचिंतणाऱ्या बळीवंश चळवळीच्या सर्व शिलेदारांना अधिकाधिक बळ मिळो, ह्याच हार्दिक शुभेच्छा ....!!
शेतकरी कुटुंबातील असल्याने 'बळीवंश'ची स्थापना
शेतकरी कुटुंबात लहानचा मोठा झालो. मायबापाची शेतीनिष्ठा बघितली. त्यांचे राबराब राबणे अनुभवले. शालेय शिक्षण काळात त्यातल्या चटक्यांच्या दाहक अनुभवही पाठिशी आहे. शेतीत राबून उत्पन्न घेतांना येणाऱ्या अनुभवात माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग असतो. याचा विचार करीत या सर्व संकटे समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी संघर्षाची भूमिका घेण्याचे ठरविले. मग फक्त आपले कुटुंबच नव्हेतर आपल्या भौगोलिक परिसरातील शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारायचे ठरवले. यामध्ये सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचा विशेषतः युवा मित्रांचा पाठिंबा मिळाला. चळवळ सुरु झाल्यावर वर्षपूर्ती कधी झाली? हे सुध्दा लक्षात आले नाही.
नितीन रावसाहेब कायंदे
रुम्हणा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा
नितीनचा उपक्रम वाखाणण्याजोगा ..
मातीत राबणाऱ्या शेतकरी कुटुंबातील असल्याने नितीन कायंदे याने स्वानुभवातून समस्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यावर उपाययोजना कशी करावी? याचा विश्लेषणात्मक अभ्यासही आहे. मग संघर्ष करण्याची गरज लक्षात आल्यावर त्याने चळवळ उभारणीसाठी चाचपणी सुरू केली. माझ्यासारख्या शेतकरी पुत्रांनी त्याला भरभरून प्रतिसाद देत उभारी दिली. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. त्यामुळे त्याने सुरु केलेला उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
विठ्ठल चव्हाण
वीरपांग्रा, ता. लोणार, जि. बुलढाणा

👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाabsolutely great sir👌
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवा