शैक्षणिक क्षेत्रात वंचितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - डॉ. शिंगणे वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत - राजू केंद्रे
शैक्षणिक क्षेत्रात वंचितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - डॉ. शिंगणे
सिंदखेडराजा:- राजू केंद्रे यांनी स्वतःचे तसेच गावचे नाव सातासमुद्रापार करीत फोर्ब्स मासिकाने त्याची दखल घेतली आहे. मात्र जागतिक पातळीवर पोहोचूनही त्याची ग्रामीण व वंचितांसाठीची कळकळ रुपी नाळ अजूनही शाबूत आहे. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठीच्या प्रयत्नासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्र यातील आंतरसबंधात सविस्तर विश्लेषण केले.
पिंप्री खंदारे येथे काल दि. १ ऑक्टोबर, शनिवारी सायंकाळी ग्रामपंचायत व एकलव्य फाउंडेशन तर्फे आयोजित आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. शिंगणे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कमलबाई मदन चौधर तर माजी जि. प. सभापती अभय चव्हाण, विठ्ठल चव्हाण, एकनाथ बुरकुल, बबनअप्पा हाजबे, भाऊराव पवार, प्रल्हाद ढाकणे आदि प्रमुख उपस्थितीत होते.
प्रारंभी लंडन येथून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या राजू केंद्रे, साहित्यिक विशाल इंगोले, पीएचडी स्कॉलर अनंता खरात, नीट परीक्षेतील गुणवंत वैभव तुपकर, सुमित इंगळे, प्रशिक गवई, स्कॉलर अक्षय कायंदे व अक्षय चौधर यांचा सत्कार करण्यात आला.
माजी जि. प. सभापती अभय चव्हाण यांनी थोर व्यक्तिमत्त्वांचा माध्यमातून बहुजन, पीडित व वंचित समाजातील अनेकांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला व त्यातूनच हा समाज प्रगतीच्या मार्गावर आल्याचे सांगितले. मात्र सध्याही इयत्ता १२ वी नंतरचे विद्यार्थी योग्य मार्गदर्शन व आर्थिक गोंधळून झालेले अभिमन्यू झालेले आढळतात. त्या अभिमन्यूंना चक्रव्यूहातून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी राजू केंद्रे यांना सहकार्य करण्याचे अभिवचन चव्हाण यांनी दिले.
सत्काराला उत्तर देतांना राजू केंद्रे यांनी ग्रामीण भाग तसेच बहुजन समाजातील हेवेदावे हे सगळ्याच प्रकारच्या प्रगतीतील बाधा असल्याचे निक्षून सांगितले. तर याचवेळी मुली तसेच मुस्लिम समाज शिक्षण प्रवाहापासून कसा दूर आहे? याचा उहापोह केला. तर वंचित, उपेक्षित, बहुजन व ग्रामीण भागातील समाजासाठी कार्य करणार असल्याचे सांगत, त्यामध्ये शैक्षणिक कार्याला प्राधान्य देणार असल्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी सरपंच कमलबाई चौधर, विठ्ठल चव्हाण, विशाल इंगोले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन भूषण पवार, प्रास्ताविक भास्कर शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन भास्कर पवार यांनी केले.
यशस्वीतेसाठी प्रदीप पवार, सुनील ढाकणे, परमेश्वर उगलमुगले, सुरेश चौधर, दयानंद कांबळे, बबन गवई, भास्कर उबाळे, विष्णू विटकर, संचित केंद्रे, राजू आघाव, गणेश उबाळे, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण सानप, विनोद खंदारे, आनंद आघाव, निलेश काकड, आनंद वरते, बाबुभाई पठाण, सुनील आव्हाड, आदिल शेख, विशाल खरात, विशाल पवार, जुबेर सय्यद, बालाजी वाघ, सलमान पठाण, किरण हाजबे आदिंनी प्रयत्न केले.
सत्कार सोहळ्याला बहुसंख्य ग्रामस्थांसह, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏